Saturday, December 10, 2011

राजकारण: एक आठवण

राजकारण म्हणजे नक्की काय असतं? हा प्रश्न अनेकदा पडायचा. नेत्यांची विधानं/भाषणं..मोर्चे/यात्रा..आंदोलनं असंच लहानपणी वाटे.

मी वृत्तपत्रांमधे राजकारणावर वाचायला सुरुवात केली असेल १९८९ सालापासुन. फ़ारसं काही कळायंच नाही. बोफ़ोर्स वरुन राजीव गांधी कसा काय चोर आहे इतकंच समजायचं. तेव्हा उल्हासनगरला रहायचो. ठाणे मतदारसंघात रामभाऊ कापसेंनी तत्कालीन कॉंग्रेसचे खासदार शांताराम घोलप ह्यांचा पराभव करुन खासदार झाले. कॉंग्रेसविरोधी लाट होती. निवडणुकीच्या स्लोगन्स वगैरे ऐकायची तेव्हा सवय झाली. त्याकाळी निवडणुक प्रचारावर भरमसाठ खर्च व्हायचा (पुढे टी.एन.शेषन निवडणुक आयुक्त झाल्यावर कमी झाला). प्रत्येक भींत रंगवली जायची. स्लोगन्स देत रिक्षा/टेम्पो दिवसरात्र फ़िरत. प्रत्य्के पक्षाचं चिन्ह माहित करुन घ्यायची उत्सुकताही असे.

विधानसभा, लोकसभा, नगरपालिका ह्या सगळ्या निवडणुका एखाद्या क्रिकेट मॅच सारख्या वाटत. निवडणुकांचा हंगामच होता तो.

व्हि.पी.सिंग पंतप्रधान झाले, देवीलाल उपपंतप्रधान. मग आरक्षणाबद्दल ऐकु लागलो. कि आरक्षणामुळे कशी काय देशाची वाट लागणार आहे. लायकी नसलेले लोकं कसे काय पुढे येतील असंच काही. मंडल कमीशनबद्दल लोकं बोलत. कोणी आत्मदहन केलं असं वाचायला मिळे. मी तेव्हा नुकताच अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयात प्रवेश घेतला होता. आमचे शिक्षक त्याकाळचे बहुतेक रा. स्व संघातले होते. शिकवायचे उत्कृष्ट, पण मधुन मधुन आरक्षण, राममंदीर वगैरेंवर बोलायचे. त्यातुनच समज झाला होता की आरक्षण वाईट आणि राममंदीर व्हायलाच पाहिजे वगैरे.

पुढे व्हि.पी.सिंग ह्यांचा पाठींबा भाजपाने काढला. सरकार गडगडले. जनता दलात फ़ुट पडली. चंद्रशेखर ह्यांना राजीव गांधींनी पाठींबा देऊन पंतप्रधान बनवलं. ही बाब तर तेव्हा खुपच नवलाईची वाटली होती..की शेवटी राजीव गांधींचाच पाठींबा घेतला. पण पुढे हळु हळु राममंदीराचीच चर्चा सुरु झाली. तो प्रचार इतका मजबुत होता की आम्हीही "हम कसम राम की खाते है...मंदीर वही बनायेंगे" आणि अशा अनेक घोषणा पाठ करायला लागलो.


त्याच काळात १९९० साली विधानसभेच्या निवडणुकाही झाल्यात. बाळासाहेब, भुजबळ, मनोहर जोशी, सुधीर जोशी ह्यांची नावं ऐकीवात येत. शिवसेना आधीपासुनच माहीत होती त्यांच्या वाघ ह्या चिन्हामुळे. विधानसभेला धनुष्यबाणाचं चिन्ह पाहुन आश्चर्य वाटलं होतं.

अंबरनाथच्या शाळेत जातांना तिथल्या मतदारसंघातले उमेदवारही कळुन येत. शिवसेनेचे साबिर भाई शेख तेव्हा निवडणुकीला उभे होते आणि कॉंग्रेसतर्फ़े कोणीतरी संजय दत्त म्हणुन उमेदवार तिथे होता. आधी तो आम्हाला सिनेस्टार संजय दत्त वाटे.

उल्हासनगरला पप्पु कलानी नगराध्यक्ष झाल्यावर उल्हासनगरचा कायापालट सुरु झाला होता. आणि कलानी लोकप्रियतेच्या शिखरावर होते. उल्हासनगरचं सिंगापुर करायचा त्यांचा इरादा आहे असं ऐकायचो तेव्हा. ९० साली ते आमदारकीला कॉंग्रेसतर्फ़े उभे राहिले तेव्हा त्यांची प्रचाराची फ़ेरी आजही आठवते. एका वेगळ्याच प्रकारच्या बससदृश मोठ्या गाडीच्या टपावर बसुन त्यांची वरात निघे.

अंबरनाथला सेना जिंकली तर उल्हासनगरला पप्पु कलानी. राज्यात थोडक्यात पवारांचे सरकार आले. तेव्हा पवारांच्या कौशल्याबद्दलही बरचं ऐकायला यायचं नक्की काय कौशल्य ते कळायचं नाही. कलानींबरोबरचे त्यांचे संबंधही ऐकायला मिळायचे. विरोधी पक्षनेता म्हणुन मनोहर जोशींची निवड झाली त्याबद्दलही चर्चा चालत की सुधीर जोशी हे जास्त योग्य होते आणि भुजबळांचा तर हक्कच होता.

त्याच काळी आम्ही अंबरनाथला रहायला आलो. आमच्या शाळा अंबरनाथला असल्याने आणि अंबरनाथ हे स्टार्टींग स्टेशन असल्याने बाबांनी अंबरनाथला घर घेतले. अंबरनाथला आल्यावर शिवसेना शाखा म्हणजे काय हे बघायला मिळाले. एका किल्ल्याची प्रतिकृती असलेली शाखा आणि त्यातले दाढीवाले शिवसैनिक ह्यांच्याबद्दल प्रचंड आदर होता. माझ्या मित्राचे मामा (पोतनीस काका) शिवसेनेत होते आणि आमच्याच गल्लीत रहायचे. तेव्हा त्यांच्या कहाण्या ऐकायला मिळायच्या. ते कसे कारसेवक म्हणुन अयोध्येला जाणार आहेत वगैरे.

महाराष्ट्रात कॉंग्रेस आली तरी देशपातळीवर वेगळेच वारे होते. राममंदीर आंदोलन जोरात असतांना कॉंग्रेसने चंद्रशेखर ह्यांचा पाठींबा काढुन घेतला होता आणि पुन्हा निवडणुक होणार होती. प्रचार जोरदार सुरु होता. पण त्या प्रचारकाळातच राजीव गांधींचा खुन झाला आणि सगळं वातावरण बदललं. कॉंग्रेसला बऱ्यापैकी जागा मिळाल्या आणि पवार पंतप्रधान होणार अशा वावड्या उठायला लागल्या. महाराष्ट्रात जवळपास ३८ खासदार कॉंग्रेसचे होते. पण त्यांनी पवारांना पाठींबा दिला नाही असं कळलं. सुनील दत्त ह्यांनी तर स्पष्टपणे नकार दिला होता हे त्यांच्या मुलाखतीत कळलं.

त्याआधी एक मोठी घटना घडली...ती म्हणजे शिवसेनेला भुजबळांनी दिलेली सोडचिठ्ठी. भुजबळ लपुन राहिले होते आणि शिवसैनिक त्यांना शोधत होते. अनेक शिवसैनिकांना अटक झाली होती, अनेक शिवसैनिक भुमिगत होते. माझ्या मित्राचे मामाही. भुजबळ म्हणजे सगळ्यात मोठा गद्दार असं वातावरण शिवसैनिकांमधे होतं आणि त्यांना धडा शिकवायची इर्षाही दिसुन येई.

पवार दिल्लीत गेल्यावर सुधाकर नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. तेव्हाच राममंदिर आंदोलनातुन बाबरीपतन झाले. ते शिवसैनिकांनी पाडले असं ऐकुन अजुनच चांगले वाटायचे. त्याच काळात मुंबईत दंगली झाल्या. पण अंबरनाथ शांत होते. साबिरभाई हे मुस्लिम असल्याने असावं कदाचित. दंगली पाठोपाठ बॉंम्बस्फ़ोट झाले. पुढे संजय दत्तला अटक झाली. सुधाकर नाईकांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं आणि पवार महाराष्ट्रात परतले.

त्याच काळात पवारांवर आरोप सुरु झाले. मुंडे हे नाव मी तेव्हा पहिल्यांदा ऐकलं. खैरनार, मुंडे बेफ़ाम होते. एन्रॉन प्रकल्प तेव्हा महाराष्ट्रात येणार होता. सुधाकर नाईकही पवारांचे विरोधक बनले होते. कॉंग्रेस मधे निष्ठावंत नावाचा गट असतो तेही त्याकाळात कळलं. पवारांवर आरोप होत होते आणि त्यांची छबी एकदम भ्रष्ट, माफ़ियांचा सरताज अशी बनली. एकुणच पवारविरोधी वातावरण होतं. १९९५ साली झालेली निवडणुक पवार हरले. अवघ्या ८० जागा कॉंग्रेसला मिळाल्या. भुजबळांचा पराभव इर्षेला पेटलेल्या शिवसैनिकांनी करुन दाखवला. बाळा नांदगावकर ह्या अपरिचित चेहऱ्याला निवडुन आणला.

पुढे युतीच्या शासनात आमच्या आसपासचे बरेच शिवसैनिक सफ़ारी घालुन फ़िरायला लागले. बिल्डर बनले कोणी कंत्राटदार...त्याचबरोबर त्यांचा उत्साहही कमी होतांना दिसत होता. ह्याच काळात आम्ही मित्रमंडळीनी शाखेत जायला सुरुवात केली. शिवसेनेच्या...संघाच्या नाही. संघशाखांमधे संध्याकाळी क्रिकेटच्या टाईमाला पकडुन घेऊन जातात आणि कसलेतरी फ़ालतु खेळ खेळवतात म्हणुन आम्ही आधीपासुनच त्यापासुन लांब होतो. मी तेव्हा इंजिनिअरींगला होतो. फ़ारसा वेळ नसे. पण तरी वीकएंड्सला क्रिकेट खेळायचो. आमची टीम फ़ॉर्मात होती.

त्याकाळी अंबरनाथला लोकल गुन्हेगारीमुळे क्रिकेट टुर्नामेंट भरविणे बंद झाले होते. वादावादीतुन कोणी तलवारी बाहेर काढी. आणि मग सगळाच गोंधळ. पण टुर्नामेंट भरवण्यात फ़ायदा खुप होता. घरुन तेव्हा पैसे मिळत नसत. आम्ही ठरवले की टुर्नामेंट भरवायचीच.

पण टुर्नामेंटमधे जर कोणी गोंधळ घातला तर काय? म्हणुन आम्ही पोलिसांकडे प्रोटेक्शन मागायला गेलो. इतक्या शिव्या पोलिसांनी घातल्या असतील तेव्हा...शिव्या देऊन पळवुन लावले त्यांनी...तुम्ही काय इंटरनॅशनल टुर्नामेंट भरवताय काय...की सेक्युरिटी पाहिजे असं म्हणुन हाकललं पोलिसांनी. मग आम्ही शिवसेनेचा सहारा घेतला. सगळे जण रोज शिवसेना शाखेत हजेरी लावायचो. माझ्या मित्राच्या मामांना आम्ही कन्व्हिन्स केलं की टुर्नामेंट भरवणं कसं गरजेचं आहे. मग त्यांनी सगळ्यांना तयार केले, स्पॉन्सर्सचा बंदोबस्त केला आणि त्यातुन आम्ही नगराध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित केली. त्यातुन आम्हाला क्रिकेट्च्या २ बॅट आणि स्टंम्पस मिळाले. आम्ही खुष होतो. पुढेपुढे शाखेला जाणे कमी झाले. तिथे गेल्यावर कळले स्थानिक राजकारण काय असते ते.

स्थानिक राजकारणात तुम्ही कुठल्याही पक्षात जा. तिथे जर तुमची मोठी गँग असेल तर तुम्हाला वाव मिळणार. त्यामुळे तिथे प्रत्येकजण आपली जास्तीत जास्त पोरं घुसवायच्या नादात असतो. त्यातुनच पदांची वाटणी वगैरे होते. पुढे राष्ट्रवादी स्थापन झाल्यावर माझा एक मित्र मला तिथे घेऊन गेला. त्याला युवक अध्यक्ष करणार होते...तो मला म्हणाला की आपली २०-२५ मंडळी घेउन चल. तुला उपाध्यक्ष करतो. पहिल्या २ मिटींगनंतर मी तिथे फ़िरकलो नाही. अर्धी लोकं बेवडा मारुन आली होती. ही लोकं कोणाचं काम करतील असं वाटलं नाही.

त्यानंतर राजकारण सुटलंच. जे वाचायचं ते पेपर मधे. बाळासाहेब आणि पवार ह्या दोघांनाही पुढे फ़ारसं यश मिळालं नाही ह्याची खंत मात्र उगाच वाटत राहते.

Tuesday, December 6, 2011

माय डॅडी द स्ट्रॉंगेस्ट......


प्रत्येक लहान मुलाला आपल्या वडलांबाबत प्रचंड अभिमान असतो. घरात त्याला आपल्या वडलांचा अधार वाटतो पण काही अभागी मुलांना वडील असुन त्या वडलांबद्दल अभिमान वाटावा अस ऎकायला मिळत नाही. अनेक कारण असतात त्यासाठी. कधी कधी वडिल खरच कोणतच चांगल काम करत नाहीत. कधीकधी घरातल वातावरण तस असत. आई वडलांची भांडण असतात व त्यामुळे आई सतत वडलांबद्दल वाईटच बोलत असते.

नुकताच मला एक अनुभव आला.

माझ्याबरोबर पूर्वी काम करणारा एक माणूस मला रस्त्यात भेटला. अतिशय हुशार असा हा माणूस, माझ्या आधीच्या कंपनीत प्युन म्हणून लागला होता. बघता बघता संगणकाच रिपेअरिंग, थोडफ़ार सॉफ़्टवेअर हा थोड्या अवधीत शिकला होता. अत्यंत प्रामाणिक असलेल्या या माणसात सर्व गुण ठासुन भरलेले होते. फ़क्त एकच दुर्गुण या गृहस्थात होता ज्यामुळे त्याचे सर्व गुण फ़ुकट गेले होते तो म्हणजे हा दारुडा होता.

अनेकवेळा मी त्याला खुप झिंगुन लडबडत चालताना पाहिलेल आहे. आज तो शुद्धीवर दिसला, म्हणुन त्याची चौकशी करावी अस वाटल. मला त्यानी रस्त्यातच नमस्कार केला.

आपल्या ३-४ वर्षाच्या लहान मुलाला घेऊन तो चाललेला होता. बाप व मुलगा दोघेही अनवाणी व विटक्या कपड्यात होते. बापाचा चेहरा दारुमुळे सुजलेला होता. मुलाला बहुतेक २-४ दिवस आंघोळ घातलेली नसावी. कपडे फ़ाटके व मळलेले होते. केस कोरडे व रखरखीत दिसत होते. मी मुलाकडे बघितल, लक्षात येत होते ते त्याचे चकाकणारे काळॆभोर, पाणीदार व मोठे डोळॆ. ते डोळे भराभर आजुबाजुचा परिसर न्यहाळात होते व मिळेल ते शिकत होते. त्याच्या बापासारखाच हाही खुप हुशार असावा. चेहरा खुप तरतरीत व बोलका होता. मी माझ्या नकळत खाली वाकलो आणि त्याला उचलुन घेतल. आणि त्याचा बाप नको नको म्हणत असता जवळाच्या दुकानातुन एक बिस्किटाचा पुडा घेऊन त्या मुलाला दिला.

त्या मुलाला म्हणालो "तुझा बाप माझा खुप चांगला मित्र आहे, खुप हुशार व प्रामणिक आहे तो. त्याच्यासारखाच हो बर का ! " तो मुलगा इतका गोड हासला. आणि त्यानी अभिमानानी आपल्या बापाकडे पाहिल. काही न बोलता मित्र मुलाला माझ्या कडेवरुन घेऊन निघुन गेला. मला वाट्ल मी बोलताना काही चुक केली की काय.

काही दिवस मधे गेले आणि तो मित्र माझ्या घरी आला. आज त्याचा चेहरा कमी सुजलेला वाटला. मला म्हणाला "काका, त्या दिवशी तुम्ही मला रस्त्यात भेटलात व मुलाला म्हणालात की ’तुझा बाप खुप हुशार व प्रामाणिक आहे’ हे ऎकल्यावर मुलानी माझ्याकडे इतक्या अभिमानानी बघितल की मला ती नजर सहनच झाली नाही. घरी जाऊन त्यानी सर्वांना सांगितल की आजोबा म्हणत होते की बाबा खुप हुषार आहे. त्यानी पहिल्यांदाच आपल्या दारुड्या बापाबद्दल चांगल ऎकलेल असेल. त्याला मी कधी बिस्किट घेऊन दिलेल नव्हत. त्याला आयुष्यात पहिल्यांदाच संपूर्ण बिस्किटाचा पुडा मिळाला. पण काका त्यानंतर दारु पिताना मला तीच नजर दिसते. पोटात ढवळुन येत आणि मी दारु न पीता सरळ घरी जातो. काल त्याला बिस्किटाचा पुडा घेऊन गेलो. त्यानी विचारल की ’आजोबांनी दिला का ?’ मी म्हणालो "नाही रे मीच तुझ्यासाठी आणला आहे, माझ्या बाळासाठी" मित्र म्हणाला "काका, मी हे बोलल्यावर त्यानी खुप आनंदानी माझ्या गळ्यात मिठी मारली. बस मी ठरवल आहे. आता दारु नाही प्यायची."

या माझ्या मित्राचा हा निश्चय किती दिवस टिकेल कल्पना नाही. पण त्या लहान मुलाला "माय डॅडी द स्ट्रॉंगेस्ट" अस नक्कीच वाटल असेल.

आपण किती नशिबवान असतो आपल्याला जगातले सर्वात चांगले आई-बाबा मिळालेले असतात. फ़क्त ते किती चांगले होते हे ते गेल्यानंतरच आपल्याला समजत. मला माझ्या वडलांच्या आठवणी एकामागोमाग एक येत गेल्या.

मला माझ बालपण आठवायला लागल. माझ्या त्यावेळच्या जगात असलेल्या प्रत्येक संकटांमधुन मला बाहेर काढायची शक्ति असलेली एकमेव व्यक्ती म्हणजे माझे वडिल. मी त्यांना आण्णा म्हणायचो. त्यांच्या रुंद छातीचा मला खुप अभिमान होता. या छातीवर त्यांनी आभाळ पेललेल होत.

कधी ताप आला, काही लागल व नुसता त्यांच्या हाताचा स्पर्ष झाला तरी दुखण कमी व्हायच. ती एक त्यांच्या प्रेमाची जादू होती.

लहान असताना मला आजी शबरीची गोष्ट सांगत होत्या. खुप रंगवुन रंगवुन त्यांनी ती कथा सांगितली. शबरीनी बोरं कशी आणली व प्रत्येक बोर चाखुन कस पाहिल. आणि रामानी तीची भक्ति पाहुन ती बोरं कशी खाल्ली

आजी सांगत होती

"शबरीनी रामासाठी रानातुन बोरं आणली व ती गोड आहेत का हे बघायसाठी प्रत्येक बोर ती चाखत होती"
"पण आजी तीनी बोरं का आणली ? आंबा किंवा सफ़रचंद का नाही आणला ? देव तीच्या घरी येणार तर चांगल करायच न. आपण नाही का पूजा असली की किती चांगल करतो"

"अरे शबरी गरिब होती"

"गरिब म्हणजे काय ? "

"ज्यांच्याकडे कमी पैसे असतात त्यांना गरिब म्हणतात. ते लोक बाजारातुन फ़ळ आणू नाही शकत "

" आपण गरिब आहोत का ? "

" आपणही गरिबच. पण ती खुप गरिब होती "

" पण आजी आपण नाही का आंबे, द्राक्ष व सफ़रचंद आणतो. ते गोडच असतात. आणि रामानी ती उष्टी बोर कशासाठी खायची ? मला नाही ते आवडल. किती घाण होता तो."

माझ्या त्यावेळच्या जगात गरिबी व श्रिमंती या शब्दांना स्थानच नव्हत. आपण खुप आंबे, सफ़रचंद व द्राक्ष खातो. शबरी थो्डी कमी गरिब असेल पण तरी थोडी फ़ार अशी फ़ळ आणत असेलच न. मला काही केल्या आजीनी सांगितलेली गोष्ट पटतच नव्हती. आजीच लॉजीकच समजत नव्हत. उगाच आजीशी हुज्जत घालत होतो.

आण्णा ऎकत होते. रविवार सकाळाचा दिवस होता. ते म्हणाले चल आपण बाहेर जाऊ. रान जवळच होत. त्यात मला नेल. एका आदिवासी माणसाच घर दाखवल. गरिबी काय असते हे मी पहिल्यांदाच पाहिल होत तेव्हा. मग त्याच आदिवास्याच्या मुलाबरोबर मला बोरं आणायला पाठवल. त्यावेळी पायात कोणाच्याच चपला नसायच्या. माझ्याही नव्हत्या. २-३ बोरं आणेपर्यंत पायात काटे रुतले. परत आलो. वडलांनी मला जवळ घेतल म्हणाले की

"शबरी किती गरिब असेल समजल का ?" मी होकारार्थी मान हलवली.

मग त्यांनी त्या वातावरणात शबरीची गोष्ट परत सांगितली म्हणाले

"त्या शबरीनी राम येणार म्हणून खुप बोर आणली. तीला किती बर काटे रुतले असतील ? जर रामानी बोरं उष्टी आहेत म्हणुन खाल्ली नसती तर त्या शबरीला किती बरं वाईट वाटल असत." मला एकदम ही गोष्ट पटली. रामाबद्दल आदर वाढला.

वडिल खुप मेहनत करत. मुंबईला नोकरीला जायचे. ठाणा स्टेशनवरुन आमच घर ५-६ मैल लांब होत. तेव्हढ अंतर चालत जाऊन ऑफ़िसमधे मेहनतीच काम करण साध नव्हत. शिवाय घरी आले की शेतीच काम, गुरांच काम होतच. खुप पसारा त्यांनी वाढवला होता. कमी शिकले असले तरी जे शिकले ते ब्रिटिशांच्या वेळच्या इंग्रजी शाळेत शिकले होते. इंग्रजीवर प्रभुत्व होत. ते एक चालती बोलती डिक्शनरी होते.

मुलांना जास्तीत जास्त शिकवायच व हे शिकवत असताना त्यांच्यासाठी काही तरी स्थावर मिळकत उभी करायचीच या ध्येयानी ते पछाडलेले होते. स्वतः १६ व्या वर्षी गिरणीत नोकरीला लागले, ते एक हेल्पर म्हणून आणि काम शिकत शिकत ते कॉस्ट अकाऊंटंट झाले. त्यांनी अनेक हालअपेष्टा काढल्या होत्या, पण त्याची साधी झळसुद्धा आमच्या पर्यंत येऊ दिली नाही. हे करताना नेहेमी ते आनंदी असायचे. मी तुमच्यासाठी किती करतोय, त्याची जाणिव ठेवा वगैरे कधीच लेक्चर दिल नाही. आईची त्यांना साथ होतीच पण मुख्य जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर होती.

बहिणी मोठ्या होत्या, आम्ही मुलं लहान होतो. मुलींची लग्न, बाळंतपणं, आला गेला या सर्वांच त्यांनी केल. आणि त्यातच आमची शिक्षणं केली. प्रॉप्रर्टीच्या केसेस पूर्ण केल्या. आमच्यावर कोणतीच जबाबदारी ठेवली नाही. मोठी घरं मात्र ठेवली.

मला नोकरी लागली. पहिला पगार १ तारखेला यायचा होता. त्यावेळच्या मानानी पगार बरा होता. ३० तारखेला त्यांनी नेहेमीसारख बजेट केल व मला म्हणाले

"आयुष्यात पहिल्यांदा बजेट केल आणि पैसे शिल्लक राहिलेत"

हे बोलताना त्यांच्या चेहर्‍यावर इतक समाधान होतं.

मी विचारल की "येताना तुमच्यासाठी काय आणू ?"

ते म्हणाले "मला मिठाई व नानकटाई खावीशी वाटते. मी कधीच मजा म्हणून या गोष्टी खाल्या नाहीत"

आमच्यासाठी त्यांनी स्वतःचे किती हाल करुन घेतले असतील हे प्रथमच मला जाणवल. १६ व्या वर्षापासून नोकरीकरुन स्वतःच्या आई, बहिण व भावाला सांभाळताना. व नंतर संसाराचा गाडा ओढताना त्यांनी कितीतरी कॉंप्रमाईज केलेली असतील. या उतार वयात या कर्तबगार माणसाला या साध्या गोष्टी खाव्याशा वाटत होत्या.

मी पगार मिळताच येताना सर्वात पहिल्या या दोन गोष्टी विकत घेतल्या आणि घरी आलो. आण्णा झोपलेले होते. त्यांना खुप ताप होता.

मला म्हणाले की "मी ताप उतरला की मी मिठाई व नानकटाई खाणार आहे."

दोन दिवस ताप होता व तिसर्‍या दिवशी त्यांना हार्टअ‍ॅटॅक आला. अ‍ॅंब्युलन्स बोलावली व त्यांना हॉस्पिटलमधे नेल. त्यांच्या चपला न्यायच्या राहुन गेल्या.

ते म्हणाले "निरंजन माझ्या चपला इथे आण रे"

मी घरी आलो आणि त्यांच्या चपला उचलल्या. पार झिजुन त्याच्या टाचांना भोकं पडली होती. आमच्यासाठी त्यांनी न बोलता किती खस्ता खाल्या होत्या, किती मेहनत केली होती, हे त्या चपलाच मला सांगत होत्या.
मी नोकरीच्या इंटर्व्हुला जाणार म्हणून माझ्यासाठी त्यांनी जबरदस्तिनी आणायला लावलेले नवे कोरे बुट माझ्या आधीच्या चांगल्या स्थितीतल्या बुटांच्या बाजुलाच होते आणि माझ्या पायात नवी चप्पल होती.
आजवर मला हे मिळाल नाही, ते मिळाल नाही, म्हणून खट्टू होणार्‍या मलाच मी मनातल्या मनात शिव्यांची लाखोली वाहिली.

आण्णांचा तोच एकमेव चपलांचा झिजलेला जोड माझ्या हातात होता. मी तसाच तो डोक्याला लावला मनोमन त्यांना नमस्कार केला. त्यांच्या त्या त्यागापुढे नतमस्तक झालो होतो. माझ्या नकळत माझे डोळे भरुन आले आणि अश्रु त्या पवित्र चपलांवर पडले.

Wednesday, November 9, 2011

तीन देवदुत

HIV Rehabilitation centre ला जायचा माझा तो पहिलाच दिवस होता. एड्‍स हा स्पर्षानी होत नाही, डास चावण्यानी होत नाही हे सर्व माहिती असून मनाची तयारी व्हायला बरेच दिवस लागले. एका मित्राकडून माहिती मिळाली होती की इथे फ़क्त लहान मुलंच ठेवतात.

या मुलांची आई/वडिल वा दोघेही एड्‌स्‌नी दगावलेले होते व या मुलांनासुद्धा त्याची लागण झालेली होती. माझ कस स्वागत होईल ? या ठिकाणी. मला मुलांशी बोलण जमेल का ?सर्वच प्रश्न होते. जे मुल काही दिवसात मरणार आहे, त्या मुलाशी कस वागायच ? त्या मुलाची मनःस्थिति काय असेल ? काहीच कल्पना नव्हती. माझा अंदाज होता मुलं बेडवर पडुन असतील.

आधी संचालिकांशी मित्रानी ओळख करुन दिली, मी विचारल की "मुलांना ती एड्‌स्‌ची पेशंट आहेत हे माहीती आहे का ?" त्या म्हणाल्या "काहींना माहिती आहे काहिंना नाही"

आम्ही मुल होती त्या हॉलमधे गेलो. ३ वर्षापासून १४ वर्षापर्यंतची मुल इथे होती. एकमेकांशी खेळणारी व थट्टा मस्करी करणारी ती मुल पाहिल्यावर ही मुल HIV झालेली असतील अस वाटतच नव्हत. माझा मित्र इथे वरचेवर येत होता त्याची ओळाख होती. मुल लगेच त्याच्या भोवती "अंकल अंकल" करत गोळा झाली. माझी ओळख करुन दिल्या गेली व मी गोष्ट सांगणार आहे अस मित्रानी परस्पर डिक्लेअर केल. मुलं गोष्ट म्हणल्यावर माझ्या भोवती गोळा झाली.

कोणत्याही परिस्थितीत असलेली मुलं गोष्ट म्हणल्यावर कशी उत्तेजित होतात ते मी तीथे बघितल. मग बिरबल-बादशहा, पंचतंत्र वगैरे मधल्या गोष्टी सांगितल्या.

हळू हळू मुलांच्या ओळखी करुन घेतल्या. ईशान ७-८ वर्षांचा, मोठा गोड मुलगा पण सर्वांना फ़ार चिडवायचा. त्याचे डोळे अचानक चमकायला लागले. ओठाच्या कोपर्‍यातुन थोड हसु यायला लागल. आणि त्यानी मला विचारल

"काका तुम्हाला भुताच्या गोष्टी येतात का ?"

बाकी मुल खु खु करुन हसायला लागली. मला समजेच ना हासायला काय झाल. माझा मित्र म्हणाला "ईशान चुप." ईशानचा व इतर मुलांचा चेहरा पडला.

भुताची गोष्ट सांगुन मला या मुलांना घाबरवायच नव्हतं. व नाराजपण करायच नव्हतं. मी मित्राला म्हणालो

"अरे असु दे"

आणि ईशानला म्हणालो " पण ईशान मला येत नाही रे भुताची गोष्ट. तुच सांग बर तुला येत असेल तर"

परत त्याचा चेहरा उजळला. तेच मिश्किल हसु परत ओठावर आल.

"काका, तुम्ही भुत पाहिलय ?"

आता तर बाकी मुलं जास्तच हासायला लागली. ईशाननी त्यांना गप्प केल.

"नाही रे मी नाही पाहिल भुत"
"काका तुम्हाला भुत पाहायचय का ?"
मी म्हणालो हो पाहिन की
"पण तुम्ही खुप घाबराल. ते भुत खुप डेंजर दिसतय"
"नाही घाबरणार दाखव"

आता तर सर्व मुल खुपच हासायला लागली. माझी उत्सुकता खुपच वाढली होती. काय बर दाखवतायत ही मुलं. काही तरी माझी फ़िरकी घेणार हे नक्कीच होत.

ईशान रेखाकडे बघुन म्हणाला.
"रेखा जरा लवकर वर जा आणि भुताला तयार कर."

रेखा जरा मोठी मुलगी, ती लगेच वरच्या मजल्यावर गेली. आणि थोड्याच वेळात ईशान मला घेऊन निघाला. सर्व मुलांचा लोंढा आमच्या मागे.

वरच्या मजल्यावर एका पडद्या समोर मला उभ केल आणि ईशान म्हणाला

"काका पडदा बाजुला करा. डेंजर भुत दिसेल तुम्हाला."

मला थोडा अंदाज आलाच होता. त्यामुळे पडद्याला हात लावताना मला खुप भिती वाटते अस मी नाटक करत होतो. मुलांकडे बघुन घाबरलेला चेहरा करत होतो आणि मुल खदखदून हासत होती. थोड्या वेळानी मी पडदा बाजूला केला. पलिकडे एक मोठा आरसा होता व त्यात माझ प्रतिबिंब दिसत होत. माझा मस्त पोपट केला होता त्या छोट्यांनी.

एकमेकांना आनंदानी टाळ्या देत व मिठ्यामारत त्यांनी त्यांचा आनंद साजरा केला. माझी फ़िरकी घेतली म्हणुन मी खोट खोट रडुन दाखवल. आणि मोठा माणुस आपल्या चिडवण्यानी रडु शकतो म्हणुन मुलं पोट धरुन हासत होती. एका प्रसंगानी माझी व त्यांची गट्टी जमली.

मग तीथेच बसुन आम्ही खुप गप्पा मारल्य़ा. शशांक छान गाणी म्हणायचा. रवी तबला वाजवायचा. कोणत्यातरी संगीताच्या क्लासमधे ते शिकत होते. शशांकचा आवाज इतका मधुर होता व रवीची बोटं तबल्यावर इतकी सफ़ाईनी फ़िरत होती की मी तर थक्कच झालॊ. ईशान तर लहान असुन सर्व मुलांना सहज कंट्रोल करु शकत होता.

हा चालू पोरगा तर मोठा नेताच होणार याबद्दल माझी मनोमन खात्रीच पटली.

आम्ही एकमेकांशी बोलताना इतके रंगुन गेलो, मुल माझ्या मांडीवर बसली होती. काही माझ्या खांद्यावर भार देऊन माझ्याशी बोलत होती. फ़ार गोड वातावरण होतं. संगीताची मैफ़िल झाल्यावर, ईशाननी मला एक एक मुलाची ओळख करुन देत त्यांची खासियत सांगायला सुरुवात केली. मग पिंकी छान नाच करते, मोहन कोणत्याही पक्षाचा आवाज काढतो वगैरे सर्व व ती मुलं मला त्यांच वैशिष्ठ दाखवत होते. परत शशांकनी एक गाणं म्हणल.

मी सहजच त्या मुलांना विचारल की तुम्हाला कोण व्हायचय ? कोणी "वैमानीक, कोणी डॉक्टर" "कोणी नर्स", कोणी काही कोणी काही उत्तर दिली. मी ईशान, रवी व शशांकला विचारल या तीघांनी मला काहीच उत्तर दिल नाही.

मी परत जायला निघालो. ही तीन मुल एकमेकांमधे काही तरी बोलत होती. मी गेटपाशी आलो. मुलांचा हात हालवून निरोप घेत होतो आणि ईशाननी "काका एक मिनीट" म्हणुन मला थांबवल. ते तीघेही जवळ आले. मी खाली वाकलो. त्या तीघांनीही माझ्या गालाची पापी घेतली व निरोप दिला.

परत ईशान म्हणाला "काका एक मिनट,"

त्यानी मला बाजूला नेल व मला म्हणाला

"काका तुम्ही विचारलत की मोठेपणी तुम्ही कोण होणार ? तेव्हा आम्ही उत्तर दिल नाही.

कारण काका आम्हाला माहीती आहे की आम्ही कधीच मोठे होणार नाही.

मोठ होण्याआधीच आम्ही आमच्या आई-बाबांसारखे एड्‌स्‌नी मरुन जाणार आहोत."

मी त्या तिघांना जवळ घेतल. त्या तिघांच्या गालाची पापी घेत मी म्हणालो

"नाही रे अस मुळीच नाही. आता बघ या रोगावर लवकरच औषध येणार आहे. आणि तुम्ही लवकरच बरे होणार आहात. मला तुम्हाला मोठ झालेलच बघायच आहे"

माझ्या बोलण्यातला फ़ोलपणा मला स्वतःला जाणवत होता.

मागे न बघता मी भराभर पायर्‍या उतरुन रस्त्यावर आलो आणि गाडित बसलो.

माझे खरे खुरे अश्रु मला त्या मुलांना दाखवायचे नव्हते

मी वरचे वर HIV Rehabilitation centre ला जात होतो. मी सर्वच मुलांशी बोलत होतो पण खर तर मला ईशान, शशांक व रवी जास्त आवडत होते. हल्ली ही तीनही मुलं वरचेवर आजारी पडत होती. कधी थंडी वाजून ताप यायचा, कधी काही, कधी काही चालू असायच. पण तोंडावरचा आनंद मात्र तसाच होता.

त्यांची तब्बेत बरी असली की मग माझ्याशी खुप गप्पा मारायचे. गाण्यांचा कार्यक्रम व्हायचा. माझा वेळ फ़ार मजेत जायचा. कधी मी त्यांना बाहेर बागेत घेऊन जायचो.

हळू हळू मुलं कोमेजत चालली होती. पारिजातकाच्या फ़ुलांच आयुष्य काही तासांचच असत, पण ते आपला सुवास दूरवर पसरवतं. कॊणालाही मोहवेल असाच तो वास असतो. जेव्हा ते फ़ुल टवटवीत असत तेव्हा पाहाणार्‍याला मोह पाडेल असच त्याच रुप असत. ही फ़ुलं हातात घ्या एक खोल श्वास घ्या मनावर असलेल टेंशन, कितीही दुःख, सर्व दूर होत. मन आनंदानी भरुन जात. ह्या गोड बाळांच्या सहवासात माझ असच व्हायच. ईशानच हासणं, माझ्या गळ्यात हात टाकुन बोलणं, माझ मन आनंदी करायच आणि रवी व शशांकच संगीत त्या शांत मनावर एक फ़ुंकर मारायच.

रवी व शशांक कोणत तरी गाण गुणगुणत असायचे व ईशान त्याचं हास्य ओठावर ठेउन फ़िरत असायचा. पण तरी त्यात हल्ली एक गंभीरपणा जाणवायचाच. मुलं हल्ली जरा जास्तच गंभीर होत होती. त्यांच्या मित्रांमधल कोणी जास्त आजारी असलं की रडवेली व्हायची. काय त्यांच्या मनात येत होत काय माहिती ? थोड डोक दुखल तर लगेच कपाळाला बाम लावून, गोळी घेऊन दोन तास झोपणारा मी, मला कस समजणार त्यांच दुःख ?

त्यांच्या मित्राच्या, सुनिलच्या निधनानी तर ही मुलं जास्तच गंभीर झाली होती. त्या दिवशी माझ्याजवळ आली, काही न बोलता नुसतीच उभी होती. मी त्यांना जवळ घेतल. मुसमुसत रडत होती. काय त्यांच मी सांत्वन करणार होतो ? माझ्याकडे शब्दच नव्हते. ईशान म्हणाला "काका सुनिल सारखा सारखा ’ माझ्या नातलगांना बोलवा ’ म्हणत होता. आमच्या जवळ खुप रडायचा. म्हणायचा की ’ नातलगांना म्हणाव की जवळ येऊ नका लांबूनच माझ्याशी बोला. पण एकदा तरी भेटायला या ’ पण काका त्याला भेटायला कोणीच आल नाही " हे सांगताना प्रथमच त्याचा आवाज रडवेला व केविलवाणा झाला होता. तो पुढे म्हणाला "काका मला पण वाटत की ......." पुढे तो बोलुच शकला नाही. मी पण विचारल नाही पुढे. आणि परत हा विषय काढला तर तो यावर कधीच बोलला नाही.

एकदा मुलांना बागेत घेऊन गेलो होतो. इतर मुलांमधे ही मुलं खर तर सहज मिसळुन जायची. कोणाही अनोळखी मुलांशी ओळख काढुन त्यांच्याशी खेळायची या मुलांना सवय होती. आज सुद्धा अशीच ही मुल बागेत एका बाजुला क्रिकेट खेळात होती. पण त्यांच खेळात लक्ष नाही हे जाणवत होत. एका कोपर्‍यात एक जोडप बसल होतं आणि ते आपल्या मुलांचे लाड करत होते. हे तिघेही ते लाड बघत उघे होते. मी जवळ गेलो त्यांना जवळ घेतलं. काहीही न बोलता मुलं परत खेळायला लागली. मधेच खेळ सोडुन हे तिघेही एकमेकांशी बोलत उभे होते. मी जवळ गेलो तरी त्यांच लक्ष नव्हत.मी मुलांशी बोलताना गुढघ्यावर बसुन त्यांच्या उंचीच होऊन बोलतो त्यामुळे माझ्या उंचीच, मोठेपणाच, त्यांच्यावर प्रेशर येत नाही व मुलं मोकळेपणी बोलतात असा माझा अनुभव आहे. मी तसाच गुढघे टेकुन त्यांचात मिसळलो. आणि काय बोलतायत ऎकत होतो. एका गाण्यावर ते बोलत होते.

मी शशांकला म्हणालो "काय रे तुम्ही फ़क्त संगीतावरच बोलता की दूसर काही बोलता ?" शशांक म्हणाला "मला आणि रवीला संगीतच आवडत. अस वाटत की कानात सतत एक संगीत ऎकु येतय. या संगीतातच बुडुन जावस वाटत. काका देव आम्हाला न्यायला येईल तेव्हा अस संगीत वाजवतच येईल का ? तस असेल तर मग काहीच हारकत नाही. त्याच्या बरोबर आनंदात जाईन " ईशान म्हणाला "काका, मला मात्र सतत हासत राहाव अस वाटत. मला आतुन हसु येत. मी खोट हासतच नाही. देव जर हासत हासत आला न काका तर मी पण हासतच त्याच्या गळ्यात मिठी मारीन."

मला हे तीनही देवदुत फ़ार मोठे वाटले, त्यांची उंची आकाशा इतकी वाटली. त्या देवदुतांपुढे मी गुढघे टेकुन बसलो होतो. एक फ़ार फ़ार खुजा माणुस.

......निरंजन

Wednesday, November 2, 2011

कुमार




नुकतच मला कोणीतरी विचारल की तुझा आवड्ता पक्षी कोणता मी म्हणालो, "माझा आवड्ता पक्षी कावळा". ऎकणार्‍याच तोंड जरा वेडवाकड झाल.

तुम्हाला सुद्धा विचित्रच वाटत न !

या कावळ्याची व माझी गट्टी झाली तीच मुळी "एक घास काऊचा, एक घास चिऊचा" पासुन.

"कावळ्याच घरट शेणाच व चिमणीच मेणाच" या गोष्टीत, घर वाहुन गेलेल्या त्या कावळ्याला ती चिमणी किती त्रास देते. बिचारा कावळा, मला त्या लबाड चिमणीच केलेल कौतुक कधीच आवडत नव्हत. त्या चिमणीचा मला फ़ार राग यायचा.

किती बिचार्‍या ह्या प्राण्यावर माणसानीसुद्धा अन्याय केलाय. त्याला पार खालच स्थान दिलय.

कावळा म्हणे "मी काळा, पांढरा शुभ्र तो बगळा दिसतसे
वाहवा तयाची करीती, मजला ते धिक्कारिती लोक हे !"

पहा त्याचा काळा रंग हे एकमेव कारण. त्या लबाड बगळ्याला सुद्धा वरच स्थान. कोणत्याही पक्षानी कपड्यावर घाण केली की लगेच आपण म्हणतो, कावळ्यानी घाण केली. का ? बाकी पक्षी घाण करतच नाहीत का ?

खर तर किती चांगला आहे हा, त्याला तुम्ही काही खायला द्या. तो कधीच एकटा खाणार नाही. काव काव करेल चार मित्रांना बोलावेल व सर्व मिळुन, जे असेल ते, असेल तेव्हढ खातील. हा गुण खर तर माणासानी शिकायला हवा. पंचतंत्रात विष्णुशर्माला सर्व प्राणी पक्षांचे गुण-अवगुण दिसले. पण कावळ्याचा हा गुण त्याला दिसला नाही.

या सर्वाच उट्ट कावळा काढतो ते त्याला पितरांच स्थान दिल जात तेव्हा. तेराव्याला पहा, नेहेमी काव काव करुन सर्व कावळ्यांना जमा करणारा हाच कावळा, कुठे तरी झाडाच्या वरच्या फ़ांदीवर बसलेला असतो व एका डोळ्यानी बघत असतो. कितीही विनवण्या केल्या तरी तो नाहीच बधत. लोकं बिचारे काव काव ओरडातात, काय काय अमिष दाखवत असतात पण जेव्हा त्याला वाटॆल तेव्हाच तो येतो.

लहानपणी पाहिलेले कावळे आठवत नाहीत पण मला आठवतोय ते माझ्या बागेत येणारे कावळे.

मी त्या कावळ्यांना मस्त नाव सुद्धा दिलेली होती. कुमार नावाचा कावळा तर माझा फ़ारच लाडका. आता हे नका विचारु की मला अनेक कावळ्यांमधुन माझा कुमार कसा ओळखु यायचा ते.

कुमार त्याच्या मैत्रीणीबरोबर असायचा व मला खिडकीतुन पाहुन मान वाकडी करायचा व त्याच्या एका डोळ्यानॊ हसायचा. हो हो हसायचाच तो.

आणि हो मला आठवतय तेव्हढे दिवसात त्यानी त्याची मैत्रीण पण बदललेली नव्हती. गॅलरीत मी त्याला खायला द्यायचो. मग तो त्याच्या सर्व कुटुंबाला, त्याच्या मित्रांना बोलवायचा व मी दिलेल साफ़ सुफ़ करायचा. मजा म्हणजे मेलेला उंदिर, कोणतीही घाण खाणार्‍या या पक्षानी कधीच अशी घाण माझ्या गॅलरीत आणली नाही.

कावळा हा चिमण्या व कबुतरांसारखा कधीही घरात येत नाही. त्याला आपली मर्यादा कळ्ते.

एकदा मी माझ्य़ा खोलीत होतो, कुमार व त्याची मैत्रीण खिडकीत येऊन जोर जोरात ओरडत होती. मी जाऊन बघीतल तर त्यांच्या बरोबर त्यांच एक छोट पिल्लु होत. मला दाखवाण्यासाठी त्यांनी ते आणलेल होत. माझ्या आदिवासी मित्रांमुळे पक्षांची भाषा थोडि थोडी मला समजत होती. त्यांच्या ओरडण्याच्या टोनवरुन त्यांना झालेला आनंद कळत होता. मी लगेच दोन बिस्किटाचे तुकडे गॅलरीत टाकले. त्या पिल्लानी माझ्याकडे बघीतल त्याला बहुतेक आई-बाबा सांगत असतील. "हा आपला मित्र बर का "

एकदा शाळॆत इतिहासाचा कंटाळवाणा तास चालु असताना, मला खिडकितुन झाडावर बसलेला कुमार दिसला. त्याच्या मैत्रीणी बरोबर बसुन मस्त चोचीनी पंख साफ़ करत होता. त्याला मी दिसलो, त्याची व माझी नजरा नजर झाली, आणि त्याच्या नजरेत असा काही आनंद दिसला की बस. त्यानी काव काव करुन त्याचे मित्र बोलावले. आणि वर्गाच्या खिडकीत सर्व जमा झाले. मी बाईंच लक्ष नाही अस पाहुन हळुच माझा डबा उघडला आणि चपातीचे तुकडे करुन खिडकीच्या कठड्यावर टाकले. सर्व कावळ्यांनी काव काव करायला सुरवात केली. माझ्यासारख्या कंटाळलेल्या बाकी मुलांनी लगेच डबे उघडले व कावळ्यांना खायला घालायला सुरवात केली. कंटाळवाण्या इतिहासापेक्षा कावळ्यांच काव काव ओरडण किती छान वाटल. आवाज इतका झाला की बाईंना शिकणच जमे ना. अशी मस्त मजा आली.

पण या पक्षाला भावना आहेत हे मात्र मला फ़ार उशीरा समजल.

माझे वडिल ज्यादिवशी गेले, त्या दिवशी स्मशानातुन यायलाच खुप उशिर झाला होता, रात्री खुप वेळ झोपच लागत नव्हती. सकाळी मी एकटाच गॅलरीत उभा होतो. चिमण्या मी खायला दिलेल खात होत्या. शेजारी TV चालु झाला होता. मला बाबांची खुप आठवण येत होती. आणि तेव्हढ्यात कुमार झाडावरुन उडत आला आणि माझ्याजवळ गॅलरीत येउन कठड्यावर बसला. त्यानी माझ्याकडे पाहिल. त्याच्या नजरेतसुद्धा दुःख होत. आज नेहेमीसारखा तो काव काव करत नव्हता. तो कठड्यावरच माझ्याजवळ सरकला. पण परत आपली मर्यादा संभाळुनच. माझ्या नकळातच माझ्या डोळात पाणी आल. तो मुका पक्षी माझ मुक सांत्वन करत होता.

स्मशानात माझ अनेकांनी कोरड सांत्वन केल होत, त्यापेक्षा हे मुक सांत्वन माझ्या मनाला स्पर्ष करुन गेल.

Tuesday, November 1, 2011

अभिमन्यु


लहानपणी काही दिवस आजी बरोबर वृद्धाश्रमात राहाव लागल त्यात अनेक अनुभव मिळाले. त्यातलाच एक.

वृद्धाश्रमात एक शार्मा आजोबा होते. मुळचे उत्तरेतले पण अस्ख:लित मराठी बोलणारे होते. ते रोज गीता, दासबोध वगैरे विषयांवर प्रवचन करायचे आणि मला मात्र रोज रात्री झोप लागे पर्यंत गोष्ट सांगायचे. आणि बाकी आजी आजोबा पण ती गोष्ट मनापासुन एकायचे. एकदा ते मला अभीमन्युची गोष्ट सांगत होते. त्यानी चक्रव्युहात कसा प्रवेश केला आणि कौरव सैन्याची कशी दाणादाण उडवली आजोबा अगदी रंगवून सांगत होते. मी स्वतः अभीमन्यु होतो. प्लास्टीकची पट्टी हातात घेवुन फ़िरवत होतो. अनेक कौरव विरांना मी यमसदनी पाढवत होतो. पण चक्रव्यह काही तुटत नव्हता. कित्येक बाण अभिमन्युला लागले होते. घायाळ झालेला अभिमन्यु लढतच होता. कर्ण, भीष्म, द्रोण, दुर्योधन सर्व वीर (म्हणजे माझे सर्व आजोबाच, लटुपटुची लढाई करत होते) अभिमन्युवर तुटुन पडले.

तेव्हढ्यात आपटे आजोबा आले आणि म्हणाले "शर्मा ब्रीज खेळायला येतोस का?"

मी आजोबांच्या गळ्यात मीठी मारली आणि म्हणालो "आजॊबा नाहि, गोष्ट पुरी करा."

का कोणाला माहिती पण गंभीर चेहर्‍यानी प्रवचन करणारे आजोबा मला मिठी मारुन रडायला लागले आणि सर्व खोलीभर एक शांतता पसरली. आपटे आजोबा म्हणाले चालेल पण एका अटीवर तू सर्व आजी आजोबांना अशी एकदा मिठी मारायचीस. झाल हे सोप काम होत. सर्वांना मिठी मारुन मी परत पट्टी हातात घेतली आणि गोष्ट परत चालु झाली. थॊड्याच वेळात आजोबा म्हणाले "आणि अभिमन्यु मेला"

मी परत आजोबांना मिठी मारली आणि म्हणालो "आजोबा नाही त्याला जिवंत करा, अभिमन्युला नाही मारायच" सगळे हसले.

आपटे आजोबा म्हणाले "अरे थांब गोष्ट तर पुर्ण होवु दे. तो कृष्ण आहे तो येवु दे."

मग ते स्वतः कृष्ण झाले आणि दोन्ही हातात दोन पट्ट्या घेवुन लढायला लागले. कृष्णानी त्यादिवशी खुपच पराक्रम केला सर्व कौरव मरत होते. खुप आरडा-ओरड चालु होती.

ऑफ़िस मधले कर्वे आजोबा धावत आले.
"आरे आपट्या तुला काय मरायच आहे का?"

त्यांनी कृष्णाला आवरायचा प्रयत्न केला पण त्यांना तलवारीचा पाढीत एक रट्टा मिळालाच. आता सर्व कौरव धरातीर्थी पडले होते. आपटे आजोबा माझ्याजवळ आले. मघाशी लढणारे आजोबा आणि आताचे आजोबा खुप वेगळे दिसत होते. त्यांना धाप लागली होती, खुप घाम आला होता. त्यांनी मला जवळ घेतल माझा मुका घेतला आणि डोक्यावर हात ठेवुन म्हणाले "चिरंजीवी भव, यशस्वी भव" हातातल्या दोन्ही पट्ट्या त्यांनी माझ्या हातात दिल्या.

आजॊबा धडपडत जाउन बेडवर पडले. त्यांनी डोळे मिटले. धावपळ झाली. मला खोलीतुन बाहेर जायला सांगीतल. दोन्ही पट्ट्या हातात धरुन मी बाहेर गेलो. थोड्याच वेळात एक ऍब्युल्न्स आली डॉक्टर आले. पण उशीर होत होता. कोणी तरी आजोबांच्या कानाशी लागल.

लगेच मला बोलवल मी आजोबांच्या जवळ गेलो. माझ्या हातात एका संधेच्या पळित पाणी दिल गेल, कोणीतरी म्हणाल की आजोबाला गंगा पाज तुझ्या हातुन पीण्याची त्याची इछा आहे. मी पाणी पाजल. आजोबा माझ्याकडे एकटक बघत होते. थोड्यावेळानी मला कळल, डोळे माझ्याकडेच बघताहेत पण त्यातला माझा कृष्ण निघुन गेलाय.

तुमच्या महाभारतात काय आहे मला महिती नाही माझ्या महाभारतात असच आहे. महाभारत इथेच संपल आणि महाभारत असच घडल.

आजही अभिमन्युच्या बॅगेत त्या पट्ट्या तशाच आहेत. कोणतही संकट येवो, बॅगेच्या तळाशी असलेल्या पट्ट्या तो बाहेर काढतो, डोक्याला लावतो, मनोभावे नमस्कार करतो आणि नवीन उमेदीनी परत लढायला उभा राहातो.

त्याचा कृष्ण्च त्याला नवीन आयुध देतो आणि अभिमन्यु परत लढ्त राहातो. कितीही कौरव येवोत, रावण वा वाली येवो. तो कधीच थकणार नाही, कधीच हरणार नाही.

त्याला खात्री आहे हा चक्रव्युह तोडुन तो नक्कीच बाहेर पडणार आहे.

Saturday, April 9, 2011

गाण्याचे शब्द

कधी कधी प्रत्येक गाण्याला आपला असा स्वतः चा काही अर्थ असतो.. अन तो अर्थ त्या गाण्याला असेल असे नाही.. कदाचित गाण्याचे शब्द काहीतरी वेगळेच म्हणणारे असतील पण ते गाणे ज्या काही आठवणी घेऊन येतात किंवा आपल्या साठी अर्थ बनून राहिलेले असते ते खूप काही वेगळे असते .. तसेच गाणे लिहिताना कवीला उमगलेला त्या कवितेचा अर्थ खूप काही वेगळा असेल, कवितेचे गाणे होताना किंवा करताना संगीतकाराला उमगलेले गाणे वेगळेच.. आणि कवितेवरून गाणे झाल्यावर त्याच्या जन्मदात्याला वाटणाऱ्या भावना खूप वेगळ्या असतील.. तसेच गाणे ऐकणारी हजारो लोक त्यांनी किती वेगळे अर्थ काढले असतील एकाच गाण्याचे.. अन मग लक्षात येते कि एकाच गाण्याला, त्याच सारख्या शब्दाला इतके अर्थ कुठून आले तर ते लक्ष कानांनी दिलेले किंवा उमगलेले अर्थ आहेत.. आता "कभी कभी" गाणे लिहिताना गुलझार नक्की कशाचा विचार करत बसले होते.. त्यांना कसे सुचले ते गाणे.. तेच गाणे म्हणताना, त्याच्यामध्ये अभिनय करताना अमिताभ ला काय उमगले असेल .. आणि तसेच आता ते गाणे ऐकताना मला वाटणारे त्याचे अर्थ किती वेगळे असतील , आहेत...
गाण्याचे अर्थ एकदाच डोक्यात बसतात असे काही नाही.. परिस्थितीवर पण त्यांचे अर्थ बदलत राहतात ..
अश्या बर्याच गोष्टी असतात ज्या नेहमी आपल्या भोवती होत असतात पण कधी त्याची जाणीव झालेली नसती किंवा आपण इतके कधी लक्ष्य दिलेले नसते त्या गोष्टींकडे.. नेहमी जाणार्या बस मध्ये दिसणारी माणसे..आपण म्हणतो कि प्रत्येक माणूस वेगळा पण हि सगळी सृष्टी कुठल्या धाग्याने बांधली गेली आहे.. प्रत्येक गोष्टी मध्ये काही साम्य आहे, ते साम्य कशातही असू शकते.. अगदी वेगळेपण असण्यामध्ये पण साम्य असू शकते.. पण ते साम्य शोधून काढायचे असते का असेच आपल्या समझून जाते .. कधी कळते आपल्याला या सगळ्या गोष्टी ? गाणे एक असताना त्याचे असंख्य अर्थ निघतात .. अन कदाचित अनेक गाणी एकच अर्थ सांगतात..
मुळात नातं गाण्याशी नसतेच ते प्रसंगांशी असते .... आता ''आयुष्यावर बोलू काही '' ऐकताना विश्वास पाटीलांची '' पानिपत '' आठवतं याला काय अर्थ आहे ? भिडलं ते पानिपत मग वाचताना कानी पडलेल्या सुरांनी शब्द साठवले ते इतिहासाचे.. आपली गाण्यांची साठवण अशीच प्रासंगिक असावी ... गाणंच काय पण आपण जपत वा मिरवत असलेलं प्रत्येक नातं त्या वस्तु ,वास्तू ,व्यक्ती ,वेस या विविधतेपेक्षा घटनांशीच असतं म्हणजे पर्यायाने स्वतःशीच ...! अंतर्मनात कुठला सूर कुठल्या नावाने उमटलाय काय सांगावं? माणसं वेगळी असतात ते खंर पण ती एकानावाने माणूस म्हणूनच ओळखली जातात हे महत्वाचं ... गुण, अवगुण सारे सारखेच ...सूर सारखे ..इतिहास सारखा ... पुराणिक बुवा पुराण सांगत राहतो ,,कोणाला राम पावेल कोणाला सीता ..! कोणाला गीता एकू येईल ,कोणाला तापा ,बाण , किंकाळ्या ...कोणाला मयसभा मानवेल कोणाला इंद्रप्रस्थ ...! वेगळेपण स्वागतार्हच पण त्यात खरेपण मात्र सारखं असलं पाहिजे ...म्हणजे मुखवटे गळून पडतील नि निरनिराळ्या भाव -सुरांची असेनात का पण गाणी सुरेल होतील .. मला गाणी आवडतातच ,शब्द भावातातच ,सूर भिडतातच , या गाण्याच्या पार्श्वभूमीवरच मी आठवणी साठवते ..गाणी नसती तर माझा पावसावर आणि भाउकतेवर विश्वास बसला असता ?

with thanks from Mrudgandha

निर्णय

कधी कधी नसतेच कुणाला कुणाशी बोलायचे.. कधी कधी कुणाला नसतेच कधी जबाबदारी घ्यायची .. कधी कधी कुणाला नसतेच करायचे बरोबर आहे ते.. कधी कधी कुणाला असतेच सवय चूक करून शिकायची .. कधी कधी कुणाला असतेच भीती छोट्या छोट्या गोष्टींची .. कधी कधी असतेच कुणाला कुणी नसायची सवय .. कधी कधी वाटतेच एकटे रहावेसे असे.. कधी कधी कुणाला जमतच नाही जे अगदी सहज जमणाऱ्या गोष्टी . .. कधी कधी नसतेच कुणाला विसरायचे .. कधी कधी वाटतेच कुणाला असू नयेत काही गोष्टी आयुष्यात .. त्याची काही कारणे नसतात .. पण ते 'च' मात्र असते.. का कुणास माहित .. वाटतच असतात अश्या गोष्टी..
आपल्या आजूबाजूला अश्या कितीतरी गोष्टी होत असतात .. ज्याच्या वर आपण विचार करत असतो आणि आपले एक मत देत असतो किंवा मनात तर नोंदवलेले असे मत असतेच.. काही काही गोष्टींबद्दल च्या मताला काही अर्थ नसतो तर काही काही गोष्टींबद्दल चे मत चुकीचे असण्याची जास्त शक्यता असते.. कधी कधी मते बदलत जातात जसे अनुभव येत जातात.. काही गोष्टी नीट दिसायला लागतात, समजायला लागतात .. तसे मतं ठाम बनत जातात .. बदलत जातात .. माणूस आपल्याला अनुभवावरून काहीतरी आपली मते बनवत जात असतो .. सगळे काही त्याला आलेले अनुभव नसतात.. काही पाहिलेले, ऐकलेले .. नकळत मनावर झालेले .. असे बरेच काही गोष्टी असतात .. पण बरीचशी मते बदलण्यासाठीच असतात कदाचित.. जसे वय वाढत जाईल , जास्त वेगवेगळे अनुभव येत जातील.. काही काही गोष्टी स्वतः बद्दल पण कळायला लागतात.. सगळ्या गोष्टी चांगल्या असतीलच असे नाही पण काही गोष्टी खूप त्रासदायक पण असतात ... कधी कधी विश्वासच बसत नाही कि आपण असे कधी वागलो होतो याचा विचार करून.. तर कधी कधी वाटत राहते आपण इतके मूर्ख कसे काय होतो .. असे पण काही विचित्र जाणीवा असतात .. आपल्याविषयी चे मत म्हणू शकतो आपण ते.. ते पण सारखे बदलत असते.. अर्ध्या वेळेला माहित पण नसते कि काय मत असले पाहिजे.. आयुष्यात आपण हजारो निर्णय घेत असतो.. त्यातले काही चुकीचे असतात काही बरोबर असतात काही आयुष्य बदलून टाकणारे, काही आयुष्य सावरणारे .. काही आयुष्य उध्वस्त करणारे... पण काही काही निर्णय घ्यावे लागतात .. वेळ आली असावी म्हणून किंवा अति झाले म्हणून .. काही निर्णय आपणच लादतो आपल्यावर .. माहित नाही का पण कुठलाही निर्णय घ्यायचा म्हणजे हृद्य आणि डोक कधीही एका बाजूने नसतात .. अगदी तो कसलाही निर्णय असुदेत..
म्हणतात ना टॅास करताना जसे नाणे हवेत फेकले जाते त्या क्षणी माहित असते कि आपल्याला काय हवे आहे .. तसेच काहीसे असते काही निर्णयांचे .. एका क्षणी तुम्हाला जाणीव होते कि आता कुठे पाऊल उचलले पाहिजे.. प्रत्येक वेळी काही चांगले निर्णय नसतात पण ते घ्यावे लागतात.. त्यांच्या बरोबर जगावे लागते आयुष्यभर .. आणि मग वाट बघणे .. एवढेच राहते हातात .. घेतलेले निर्णय किती बरोबर होते आणि चूक होते हे जाणून घेण्यासाठी वाट बघायची... वेळ पण खूप विचित्र गोष्ट आहे .. म्हणूनच कदाचित त्याला 4th dimension म्हणत असतील का ? म्हणजे कसे त्याचे परिमाणच वेगळे असतात नेहमी .. कुठल्याच गणितात न बसणारे..
बस मधून जाताना तुम्ही डोळे मिटून २ मिनिट विचार करायला लागता आणि मग ते असे सगळे घेतलेले निर्णय यायला लागतात डोळ्यासमोर.. घडलेल्या चुका.. त्यातून शिकलेले अनुभव .. खूप साऱ्या आठवणी .. अश्या खूप साऱ्या गोष्टी .. ज्या आपण कुठेतरी आत लपवून ठेवलेले असते.. असे काय असते त्या २ मिनिटाच्या डोळे मिटन्यामध्ये माहित नाही.. पण बाकीचे सगळे आवाज बंद होऊन जातात आणि कुठल्यातरी दुसऱ्या दुनियेत गेल्यासारखे वाटते. आणि डोळे उघडले कि काहीच बदलेले नसते... काही चुकीचे निर्णय .. काही चांगल्या गोष्टी .. काही जिवाभावाची माणसे.. काही रस्त्यामध्ये सुटलेली माणसे.. काही बदलेले चेहरे.. काही बदलेली नाती .. सगळे कसे तेच असते.. काही बदलेले नसते..
मग कधी कधी नसतोच कुणाला विचार करायचा भविष्याचा... कधी कधी नसतेच जगाचे भूतकाळामध्ये कुणाला .. कधी कधी असतेच कुणाला सवय चुकीचे निर्णय घ्यायची.. कधी कधी असतेच चुका करायची सवय .. कधी कधी असतेच कुणाला ..... !

Saturday, January 22, 2011

मांजर

मी खूप लहान असतांना बालसुलभ हट्ट करून आमच्याकडे एक पोपट आणला होता. त्याला काहीबाही बोलायला शिकवण्याचाही प्रयत्न केला. दुर्दैवाने त्याने महिन्याभरातच मान टाकली. (त्याची कबर अजून आमच्या जुन्या वाड्यात आहे. त्या प्रसंगापासून मी कुठलाही प्राणी आपण होऊन पाळण्याचा प्रयत्न केला नाही. कारण भीती- ’पुन्हा पोपट व्हायचा.’

मात्र एक प्राणी नंतर मजेशीररित्या पाळला गेला. मांजर. हीचे नावच होते ’मांजर!’ किटी वगैरे भानगड नाही. (हे नाव आता इतके अंगवळणी पडले आहे की दुसर्‍या कोणत्याही मांजराला ’मांजर’ म्हणावे वाटत नाही.) तर हे असे मांजर आम्ही पाळले आहे, हा दावा आमच्या कॉलनीतले किमान दहा कुटुंब करू शकतात. या मांजराचे निरीक्षण करता करता मला कधी हा प्राणी आवडू लागला, ते कळलेच नाही. यापुढील वर्णन माझ्या मांजराचे असले, तरी ते सर्व मांजरांना सारखेच लागू पडत असावे, असा माझा कयास आहे.
आमच्या या प्राण्याचे एकंदर व्यक्तिमत्व हे घरातल्या एखाद्या बिघडलेल्या मुलीसारखे असते. केव्हाही वेळीअवेळी घरात येणार. घरातली यच्चयावत माणसे आपल्याकडे पाहत आहेत याची पूर्ण जाणीव असूनसुद्धा खुशाल दुर्लक्ष करून आपल्या आवडत्या जागेवर जाऊन बसणार. दिवसातून दहा वेळा आपले अंग चाटुनपुसून साफ करणार. गल्लीतल्या उनाड बोक्यांना विनाकारण नादी लावणार इत्यादि. सकाळी आणि संध्याकाळी बरोबर चहाची वेळ झाली, म्हणजे मांजर अंगाला आळोखेपिळोखे देत घरात हजर. त्यानंतर जो कुणी उभा असेल, किंवा खुर्चीवर बसला असेल त्याच्या पायाशी लाडीक चाळे, मधूनच एखादे मंजूळ "म्यांव" वगैरे. ही सगळी लाडीगोडी दुधासाठी आहे, हे आपल्याला कळत असूनही आपण उगाच त्याच्या डोक्यावर हात फिरवायचा. कारण एवढी एकच वेळ असते जेव्हा मांजर निवांतपणे आपल्याला डोक्यावर हात फिरवू देते. (मांजराचे डोके विलक्षण मऊ असते.) एकदा आईने दुधाची ताटली पुढे केली, की त्याचा आपला संबंध संपला. नंतर डोळे मिटून दुधावर ताव मारायचा, एकदा मस्तपैकी मिशीवर जीभ फिरवायची आणि मजेत चालू लागायचे. पोट भरलेल्या मांजराचे लाड करणे केवळ अशक्य. तुम्ही तिच्या नुसते जवळ गेलात तरी 'Mind your own business' असा एक तुच्छ कटाक्ष टाकून मांजर चालू पडते.

खरं तर अजून एक दुसरी वेळ असते. हिवाळ्याच्या दिवसात सकाळी आठ वाजता ’गोव्याच्या बीचवर सनबाथ घेत पहुडलेल्या विदेशी ललनेप्रमाणे’ मांजर घराच्या मागच्या ओट्यावर ऊन खात बसलेली असते. अशा वेळी मांजर आपल्या अंगाचे असे काही मुटकुळे करते की तिचा एकही पंजा बाहेर दिसत नाही. आपण तिच्याजवळ जायचे. तिला हे फारसे पसंत पडत नाही, पण उठून दुसरीकडे जाण्याचा अंमळ कंटाळा आल्याने ती आपल्याला हात लावू देते. आपण डोक्यावर हात फिरवावा. ती डोळे बंद करते. आपण मानेवर, पाठीवर हात फिरवल्यावर ती कंठातून ’गर्रर्रर्र....’ असा काहीसा आवाज काढते. हा आवाज पसंतादर्शक असतो की नापसंतीदर्शक, ते मला आजवर कळलेले नाही. थोड्या वेळाने मांजरालाही आपला उबदार हात आवडू लागतो. मग मांजर उगाच मान तिरपी करून "आता इकडे जरा खाजव, कानाच्या मागे.. आता जरा गळ्याला.." असे सिग्नल्स देते. आपल्याला न्हावी असल्याचे फिलींग येऊ लागते.

मांजर प्रचंड स्वार्थी प्राणी आहे. एकदम कामापुरता मामा. पण एवढ्या एकाच गोष्टीसाठी मला मांजर फार आवडते ! मांजर आपल्या नैसर्गिक प्रेरणांशी प्रामाणिक असते. त्याने आपली Dignity सोडलेली नाही. कुत्रा जसा माणसाच्या आहारी गेला आहे, तसे मांजर गेलेले नाही. कुत्र्याच्या डोळ्यात असंख्य वेळा दिसतात, तसे आशाळभूत भाव मांजराच्या डोळ्यात मला कधीच दिसलेले नाहीत. खरं तर मराठी भाषेत ’आशाळभूत’ हा शब्द आपले अस्तित्व टिकवून आहे, तो केवळ ’कुत्रा’ या प्राण्यामुळे !
मांजराने रस्त्यात येणे अशुभ मानले जाते. पण मांजराला जीवे मारले तर फार मोठे पाप लागते, अशी समजूत आहे. खरं तर मांजराचा कुठल्याही देवाकडे वशीला नाही. मांजर कुठल्या देवाचे वाहन नाही. पुराणकथांमधे त्याचे फार उल्लेख नाहीत. तरीही मांजराला मारण्याचा आपल्याकडे इतका बाऊ का करतात, हे मला अजून कळलेले नाही.

कारण काहीही असो, मांजराला मारता येत नाही हे किती चांगले आहे; नाही?

Thursday, January 20, 2011

रुटीनचे व्यसन

रात्रीचे ३ वाजलेले असतात .. कितीदा हि कुशी बदलून पहिले तरी काही झोप येत नसते... डोक्यात खूप काही विचार चालू असतात.. बरेचसे चांगले नसतात.. डोक्यातले विचार घालवण्यासाठी तुम्ही उठून पाणी पिता, मोबाईल चेक करता उगीचच इतक्या रात्री कोण फोन किंवा मेसेज करणार आहे ... ?? त्यानंतर तुम्ही परत काही वेळ झोपायचा प्रयत्न करता ... काही उपयोग होत नाही .. आणि मग अचानक आई ला फोन लावतो.. तिचा दिवस असतो ... त्यामुळे ती काही बाही कामे करत असते.. फोन केल्यावर हेल्लो म्हणायच्या ऐवजी ती विचारते झोपली नाहीस का अजून ? किती वाजले ?? मी म्हणते काही नाही ग.. असाच झोप येत नव्हती.. मग ती इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगायला लागते.. पण आपण त्यातले काही ऐकत पण नसतो.. नुसतेच हो हो म्हणत असतो.. अन मग कंटाळून आईला म्हणतो कि ठीक आहे चल मी ठेवते फोन .. झोपते.. नेमके फोन ठेवता ठेवता आई म्हणते कि काळजी करू नकोस होईल सगळे व्यवस्थित, नको इतकी काळजी करूस... ! अन मग फोन समाधानाने ठेवत आपण झोपून जातो.. एकही कुशी न बदलता.. कसे जमते आई ला ते ?? कसे कळते तिला कि exact कुठले शब्द ऐकायचे आहेत आपल्याला.. !
संध्याकाळी ऑफिस मधून घरी आल्या आल्या .. येऊन टेबल वर बसलेली मी.. चहा प्यायची इच्छा आहे पण बनवायची नाही आहे .. म्हणून तशीच मी बसलेली.. तेवढ्यात रुममेट येते.. आणि म्हणते चल मी मस्त चहा करते प्यायचा आहे का तुला.. ? मी आपल्याच विचारात मग्न काही बोलतच नाही... १० मिनिटाने ती चहाचा कप ठेवते अन जाते निघून तिच्या रूम मध्ये.. थोड्या वेळाने ती परत येते मी आपली तिथेच बसलेली .. ती येते अन म्हणते चल बाहेर जाऊयात कुठेतरी .. मी काही न बोलता बाहेर पडते तिच्याबरोबर.. पूर्ण वेळ आम्ही काहीही बोलत नाही .. घरी आल्यावर एकमेंकींना गुड नाईट करतो अन जायला लागतो आपआपल्या रूम मध्ये.. जाताना हक मारून रुममेट म्हणते.. "dont worry you'll be fine.. " अन अचानक जग परत नॉरमल वाटायला लागते.. कधी अनोळखी असणारी रुममेट जिवाभावाची मैत्रीण होऊन जाते.. अनोळखी देशात ती कधी आपली family होऊन जाते.. तिला कसे कळते कधी शांत बसले पाहिजे आणि मी काय विचार करत आहे हे न सांगता तिला कसे कळते... !
साधारण ७-८ महिने झालेले असतात तुम्हाला बोलून.. पण कधी काळी ज्यावेळी फक्त कॉलेज आणि परीक्षा याच नको असलेल्या गोष्टी होत्या .. अश्या काळातला तुमचा खूप चांगला मित्र.. पण नंतर करिअर च्या मागे लागल्यावर कुठेतरी मागे पडलेला मित्र.. असाच कुठल्यातरी निवांत रविवारी आठवण येते त्या सगळ्या जुन्या दिवसांची आणि मग आपण फोन हातात घेतो .. फोन लागतो.. हेल्लो म्हटल्या म्हटल्या तो तुमचा आवाज ओळखतो .. आणि इतका खुश होतो कि वाटतात कि ते सोनेरी दिवस परत आले आहेत.. त्याच्याशी बोलायला काही उरलेले तर नसते.. पण इतके दिवस कुठे होतास विचारण्याऐवजी तो जिथे सोडले होते तिथून उचलल्यासारखे बोलायला लागतो.. अन सगळे अंतर गळून पडते .. तुम्ही तसेच जुने मित्र बनून जाता परत एकदा.. कॉलेज च्या कट्ट्यावर दंग करणारे.. तिथे का हेवेदावे, अहंकार मधे येत नाही.. कडू आठवणी ऐवजी आपण चांगल्या आणि मनाच्या एका कोपऱ्यात ठेवलेल्या आठवणी का बोलायला लागतो .. अचानक.. सगळे समज गैरसमज कसे काय गळून पडतात ?? वर्तमान बद्दल काही माहिती नसले तरी भूतकाळ कसे काय इतके जोडून ठेवतो .. !
गाडी पंक्चर झालेली असते म्हणून तुम्ही एखाद्या दिवशी ट्रेनने जात असता .. अचानक ऑफिस मधला नेहमी कॉर्रीडोर मध्ये किंवा एलीवेटर किंवा लंच रूम मध्ये दिसणारा माणूस दिसतो.. तुम्ही त्याला हजारदा पाहिलेले असते पण कधी बोललेलो नसतो फक्त कधीतरी हसून निघून गेलेला असता.. अचानक त्याला बघून तुम्ही हसता.. अन मग तो बोलायला सुरु करतो काही बाही .. नावांची देवाण घेवाण होते.. ऑफिस मध्ये पोचेपर्यंत तुम्ही बोलत राहता .. आणि तुमचा स्टेशन येते .. उतरता उतरता तुम्ही म्हणता त्याला कि चल भेटू परत अन तो तुम्हाला सांगतो नाही आज माझा शेवटचा दिवस आहे .. आणि अचानक तुम्हाला त्याचे वाईट वाटते.. ज्याचे इतके दिवस नाव पण माहित नव्हते आणि तुम्ही कधी बोलला पण नव्हता .. तर त्याच्या जाण्याचे दुःख का असावे मला ? असे नुसते रोज हसून आणि काही न बोलता नाती कशी जोडली जातात .. आणि त्या माणसाला जाणून घ्यायची इच्छा का निर्माण होत राहते ?? येता जाता दिसणारा तो अनोळखी माणूस कधी तुमच्या आयुष्याचा भाग होतो ते तुम्हाला कळत पण नाही . आणि तुम्ही स्वतःवरच चिडता कि का इतके दिवस आपण कधी बोललो नाही त्याच्याशी .. पण असले प्रश्न नेहमीच अनुत्तरीत राहतात नाही का .. !
माणसाला रुटीनचे व्यसन असते .. एखादी गोष्ट नीट झाली नाही तर पुरा दिवस काहीतरी चुकल्यासारखे असे वाटण्यात जातो .. मग आई- बाबांबरोबर राहताना कधी न जाणवलेले आई चे अस्तित्व अचानक रुटीन मध्ये कुठे येते, कॉलेज मध्ये असताना रुटीनचा भाग असलेला जिवाभावाचा मित्र कधी रुटीनच्या बाहेर पडून भूतकाळ होतो, रुममेट म्हणत असताना रुटीन मध्ये कधी family होते कळत नाही ... तसेच काहीसे रुटीन जरा बदलेले कि नकळत घडणाऱ्या बऱ्याच गोष्टी अचानक समजायला जाणवायला लागतात .. पण आपण फक्त परत त्या रुटीनलाच धरून चालायला लागतो .. नाही का ???

Saturday, January 15, 2011

रूममेट !

सकाळचे साडेसात.

तू आपल्या बेडवर अजगरासारखा अस्ताव्यस्त पसरलेला आहेस.
ओठाच्या कोपर्‍यातून ओघळलेला मुखरस तुझी कळकट्ट उशी भिजवतो आहे. हेही तसे रोजचेच.
गेल्या काही शतकांत साबणाचा स्पर्शही न झालेला तुझा टॉवेल अर्धा बेडवर, अर्धा जमिनीवर असा लोळतोय.

गेली तीन वर्षे सातत्याने हेच दृष्य मला सकाळी उठल्यावर दिसते आहे. त्याला कारणही आहे म्हणा.
तुझी सातत्याने नाईट शिफ्ट, आणि माझी सकाळची. मी निघण्याच्या तासभर आधीच तर तू येऊन झोपलेला असतोस ! संध्याकाळी मी रूमवर येतो, तेव्हा तू जेवायला मेसवर आणि तिकडून परस्पर कामावर. आपण दोघेही जागृतावस्थेत असे रविवारीच थोडेफार येतो एकमेकांच्या वाट्याला. तेही, मी ट्रेकवर आणि तू तुझ्या मैत्रीणीच्या गावाकडे गेलेला नसशील तर !

तीन वर्षे झालीत मला या रूमवर येऊन. माझ्या आधीपासून तू इथे राहतोस. माझ्या आधी जो इथे रहात होता, त्याच्याही आधीपासून तू इथेच आहेस असे कळले. या रूमच्या रंगहीन, जुनाट भिंतीइतकाच तूसुद्धा या रूमचा अविभाज्य भाग असावास, असे मला कायम वाटत आले आहे. घरमालकही तुझ्यावर कधी गुरकावतांना दिसत नाही. तुझ्या निर्ढावलेपणाला तोसुद्धा सरावला असावा.
आज मात्र मला तुझी चीड येत नाहीये. मला आठवताहेत, ते या रूममधले माझे सुरूवातीचे दिवस. नव्या जॉबची नवलाई, नवी स्वप्ने घेऊन माझा या नव्या शहरातला पहिला प्रवेश. आणि एका दूssssरच्या नातेवाईकाने एका स्वस्तातल्या इस्टेट एजंटकरवी मला मिळवून दिलेली ही रूम. (मी त्याच्याकडे मुक्काम टाकेन की काय अशी भीती असावी बिचार्‍याला !) त्यादिवशीसुद्धा झालेले तुझे पहिले दर्शन फारसे सुखावह नव्हते. सावळा, लुकडा आणि सर्वसामान्य किंवा कुरूपात जमा होणारा आपला देह घेऊन दुपारी केव्हातरी अंघोळ करून तू आपल्या अडीच इंच व्यासाच्या आरशात बघत दाढी कोरत होतास. निव्वळ साबण चोपडलेले तुझे गालफड खर्र खर्र असा त्रासदायक आवाज करत होते. रूमभर एक कुबट वास भरून राहिलेला होता, आणि कचरासुद्धा. नंतर मला त्याची सवय झाली, हा भाग अलाहिदा !

तू शब्दश: नि:संग आहेस.
तुला कपड्यांचा साबण विकत घेतांना मी कधी पाहिलेले नाही. माझा कपड्यांचा साबण तरी वापरत असशील, अशी एक वेडी आशा माझ्या मनात आहे.
अंघोळीचा साबण मात्र घेतोस विकत ! गोदरेज नंबर वन. तो बहुधा दाढीमुळे आवश्यक असावा.
तुझी टूथपेस्ट ही द्रौपदीच्या थाळीसारखी असते. संपता संपत नाही.
तुझे मोजून तीन ड्रेस दिसतात मला. आणि एक चौथा आहे, पण तो फक्त मैत्रिणीला भेटायला जातांना घालत असतोस.
याशिवाय तुझ्याकडे एक चप्पल, एक ऍक्शनच्या स्पोर्ट शू ची पेअर, एक सोलापुरी चादर, एक ’रंग ओळखा’ टॉवेल, तेल, कंगवा, आणि एक पुस्तकांनी भरलेली ट्रंक एवढी जंगम मालमत्ता आहे. त्यातली पुस्तके कोणीही पाहिलेली नाहीत. मीसुद्धा.

एकंदर आर्थिकदृष्ट्या तुझे फारसे बरे चाललेले दिसत नाही. तुला चहाशिवाय अन्य जिन्नस हॉटेलात किंवा टपरीवर घेतांना कोणी पाहिलेले नाही. तू स्वत:बद्दल फार कमी बोलतोस. किंवा एकूणातच घुम्या आहेस. तुझे माझे फारसे जमणार नाही, असे मला आधी वाटले होते. दुर्दैवाने माझा हा तर्क पडताळून पाहण्याइतकाही आपला सहवास कधी घडला नाही. तीन वर्षात आपण फक्त तीन वेळा सोबत हॉटेलात जेवलो. (ते तीनही माझे वाढदिवस होते !) हॉटेलात माझ्या मित्रांशीही तू कामाशिवाय एक शब्द बोलला नाहीस.
याशिवाय एक सिनेमा पाहिला, जो अति टुकार असल्याने आपण इंटरव्हलमधून बाहेर पडलो, आणि माझ्या बाईकवर शहरभर भटकत राहिलो. तुला त्या दिवशी पहिल्यांदा आणि शेवटचेच आनंदात पाहिले मी ! तुझ्या एरवीच्या निर्विकारशा सामान्य चेहर्‍यावर ’आनंद’ ही भावना मोठी देखणी दिसत होती. (आदल्या दिवशी नक्कीच तुझ्या मैत्रिणीने काही आनंददायक सांगीतले असावे, असा तर्क मी केला.) त्या दिवशी रात्री दीड वाजता तुला कॉफी पिण्याची लहर आली चक्क ! मग आपण रेल्वे स्टेशनवरच्या ’कमसम’ मधे जाऊन बसलो, पहाटे चारपर्यंत. तिथे तू मला तुझ्या मैत्रीणीचे नाव सांगीतलेस. तिची आणि तुझी लव्ह स्टोरीसुद्धा थोडक्यात (दीड तासात) ऐकवलीस. मला झोप येत असल्याचे बघून तू आवरते घेतलेस. बिल देऊन मी बाईक काढली आणि आपण परतलो. अरे हो- तुला साधी बाईकसुद्धा चालवता येत नाही !

बस्स.
तीन वर्षातल्या आपल्या दोघांच्या अशा एवढ्याच आठवणी. बाकी सगळी नुसती निरीक्षणे.
त्या कॉफीवाल्या दिवसानंतर, खरं तर रात्रीनंतर तू पुन्हा आपल्या कोषात गेलास ते आजतागायत. नंतर आणखीही काही घडले असावे कारण एव्हाना तू अगदीच अबोल-- खरं तर मुका झाला आहेस. मी तुला कधी तुझ्या समस्यांबद्दल विचारले नाही, आणि तू स्वत:हून काही सांगायचा तर प्रश्नच नाही.
मी विचारायला हवे होते का??

असे असूनही, आपले एक नाते तयार झाले. आपण मित्र आहोत का? बहुधा नाही.
"रूममेट्स" हेच त्या नात्याचे नाव.
आपण नकळत एकमेकांची काळजी घेतो. अगदी सहजच.
आणि गरज नसेल तेव्हा दखलही घेत नाही एकमेकांच्या अस्तित्वाची.
मला हे फार आवडते. तू, मी आणि ही टीचभर रूम मिळून एक स्वयंपूर्ण, एकजिनसी असे विश्व तयार झाले आहे- जे कुठल्याही बाह्य प्रेरणेशिवाय सुरळीत चालत असते. मानवी ह्रदयासारखे जणू.

आपल्यात काही अलिखीत करार झाले आहेत. मला सकाळी घाई असते म्हणून तू बाथरूम मोकळे ठवतोस. मी गेल्यावर अंघोळ- तयारी करतोस. (यात बहुधा तुझीही सोय आहेच.) याबदल्यात मी रूम आवरून ठेवतो.
माझा पेपर तुला दररोज वाचायला मिळतो.
तुझा अडीच इंच व्यासाचा आरसा एव्हाना मीसुद्धा विनासायास वापरू लागलो आहे.
मी कधी तुझ्या ट्रंकेतल्या पुस्तकांची, तुझ्या मैत्रिणीची, तुझ्या जॉबची चौकशी करत नाही. तूसुद्धा माझ्या दर रविवारच्या एकट्याने गड-किल्ले भटकण्यात कधी फारसा रस दाखवला नाहीस.
माझ्या बाईककडे आणि कधीकधी दारात येणार्‍या शेळीकडे तू त्याच कोरड्या समभावाने बघतोस. तू चुकूनही माझ्या मोबाईलला हात लावला नाहीस.
हल्ली हल्ली तू मला आवडू लागला आहेस !

तुझी आठवण नक्कीच येईल.
हो, मी ही रूम सोडून जातो आहे. आठवडाभरापुर्वीच ठरले खरं तर. तुला सांगणारही होतो.. पण आपली भेट कुठे होते रे? एकाच छपराखाली राहणारे दोन अनोळखी जीव आहोत आपण.
काल ड्यूटीवरून आल्यावर मी सामान पॅक करायला घेतले, तेव्हा विचारायला हवे होतेस तू. किंवा मी तरी सांगायला हवे होते.
आज रविवार. त्यामुळे तुला वाटले असणार की मी नेहमीसारखी भटकण्याची तयारी करतो आहे. तू काहीच विचारले नाहीस !

आता सकाळी दहा अकरा वाजता उठशील तेव्हा तुला हे पत्र मिळेल. या पत्रावर ठेवलेले माझे FasTrack घड्याळ चुकून इथे राहिलेले नाही. ते तुझ्यासाठीच ठेवले आहे. मला माहित आहे, ते तुला फार आवडते म्हणून. तुझ्या मैत्रिणीला भेटायला जातांना कायम मागुन घ्यायचास.
तू माझ्याकडून- दिवसभरासाठी का होईना, पण हक्काने मागून घेतलेली अशी ही एकच वस्तू !
आपण दोघांनी शेअर केलेल्या अवकाशातल्या काही क्षणांची यानिमित्ताने तुला आठवण येईल, अशी एक (वेडी?) आशा ठेऊ का?

मिस करेन तुला. फोन कर. पेपर नको असल्यास त्या पोर्‍याला सांग तसे.
परत या शहरात आलो, तर नक्कीच भेटेन तुला.

मला खात्री आहे, तू याच रूममधे असशील, तेव्हाही !



तुझाच-

रूममेट.

Wednesday, January 12, 2011

स्वप्न आणि आयुष्य

खूप काही व्हायला खूप काही दिवस जायला लागतात असे काही नाही आहे ना ? म्हणजे काही काही वेळेला एकाच क्षणामध्ये मध्ये किती गोष्टी होऊन जातात .. ज्याचा आपल्याला पत्ता पण लागत नाही .. आणि जेव्हा त्या गोष्टी घडल्यामुळे झालेला परिणाम दिसायला लागतो आयुष्यामध्ये तसा खूप उशीर झालेला असतो.. म्हणजे तुम्ही मागे वळून बघू शकता पण फारसे काही बदल करू नाही शकत.. मुळात जे काही झाले ते तुमच्या चुकीमुळे झाले असे नसेल.. पण त्यावेळी एखादी बरोबर गोष्ट अचानक चुकीची वाटायला लागते.. माहित नाही का पण काय विचार केला होता आपण असा विचार करायला लागतो आपण .. आणि माहित नाही ते बरोबर आहे का चूक आहे कारण प्रत्येक विचाराच्या मागे त्यावेळची परिस्तिथी खूप प्रमाणात अवलंबून असते.. आणि चुका लक्षात आल्यावर मागे वळून बघण्यापेक्षा पुढे जाताना करायचे बदल विचारात घेतले पाहिजेत ना खरतर .. पण असे घडत नाही .. आपण त्यात अजूनच गुरफुटत जातो .. आणि अचानक एका संध्याकाळी लक्षात येते आयुष्य निघून गेले.. इतक्या गोष्टी ठरवल्या होत्या करायच्या .. काहीही पूर्ण करू नाही शकलो.. पण दुसर्याच्या चष्म्यातून बघताना गोष्टी खूप वेगळ्या दिसत असतात.. कदाचित.. वरवर आपण सुखी दिसणारी माणसे किती मनाने खचलो आहोत .. किती ओझ्यामध्ये राहत आहोत .. कशाचे भान नसते ना राहिलेले आपल्याला.. अन काय मिळवायचा आटापिटा करत असतो आपण आपल्याला तरी उमगलेले असते का ते कुणास ठाऊक.. आता माझ्या आयुष्यातला कितीतरी अश्या गोष्टी आहेत ज्या मी का केल्या याची उत्तरे मागे वळून बघताना कधीही मला मिळत नाहीत अन लहान होतो वेडे होतो म्हणून काही गोष्टी सोडून देता येतात पण अखं आयुष्य आपण असे नाही जाऊ देऊ शकत.. अन असा विचार करता करता परत बरेच वर्षे उलटून जातात.. म्हणजे आपण जगायला कधी लागतो असे म्हणायचे..

म्हणजे नेहमीच सगळ्यांना असे वाटत असते कि आपण जसे जसे मोठे होवू तसे चांगले जीवन कसे जगावे कळत जाईल तर याच्या बरोबर उलटे होत जाते का ??? अजून काय होते.. म्हणजे तसे बघायला गेले तर मोठे झाल्यावर बर्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत.. पण जशी जशी मागच्या प्रश्न्याची उत्तरे मिळत जातात तसे तसे प्रश्न पण वाढतच जातात कि .. त्यांचा मेळ लावायचा असे ठरवले तर जीवन जगणे म्हणजे फक्त आपण अस्तित्वात असण्यासारखे आहे.. बाकी काही जगणे राहतच नाही ना मग ??? आणि खरच जीवनात आयुष्य शोधायचे असेल तर प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजेत का ? आहेत ते आयुष्य प्रश्नांना सोडून जगले पाहिजे.. आणि खरच असे जगता येते का? प्रश्न समस्या यांना जर आयुष्यात स्थान दिलेच नाही तर जीवनामध्ये आयुष्य राहील का ? म्हणजे जर प्रश्न, प्रोब्लेम सगळे हातात हात घालून चालत असतील तर त्यातच आपण आयुष्य का नाही शोधात.. पण इतके लांब का पाळतो त्यापासून.. आणि त्यातल्या कितीतरी गोष्टी आपल्याला नेहमीच हव्या असतात पण मिळाल्या कि त्या का आपल्या नाही राहत? म्हणजे ते काहीतरी दुसर्याचे स्वप्न पूर्ण केल्या सारखे का वाटत राहते.. आणि माझे मलाच प्रश्न पडायला लागतात कि हेच स्वप्न मी पहिले होते का ? आणि पहिले असले तर ते आता पूर्ण झाले आहे मग आता काय करायचे ? नेहमी माणसाने स्वप्न पाहिली पाहिजेत न .. तसे असेल तर मग मला माझ्या पुढच्या आयुष्यातली स्वप्न का नाही हात धुवून मागे लागून पूर्ण करायची आहेत.. असे का आहे ?

काही काही गोष्टी कळणे म्हणजे खूप अवघड असते तसेच काही गोष्टी समजल्या पाहिजेत असा अट्टाहासच असायची गरज नाहीय पण काही काही गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजेत.. तुम्ही तुमच्या आयुष्याचे काय करायला चालला आहात? किंवा त्यामध्ये काय जगत आहात .. ? हा पण विचार असला पाहिजे... असे नाही आहे कसे जगले पाहिजे हा विचार करता करताच आयुष्य संपून गेले पण .. तरीही .. काहीतरी असले पाहिजे आयुष्यामध्ये ज्याच्या मागे तुम्ही मनापासून लागला आहात.. आणि ते स्वप्नपूर्ती चा ध्यास तुम्ही घेऊन जगत आहात..

प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असल्या तरी आपण एकाच बाजूचा नेहमी विचार करतो न .. ? मग तसेच काहीसे आहे प्रत्येक गोष्टीचे.. तुम्हाला हवी ती बाजू तुम्ही बघू शकता.. त्यातून पुढे जाऊ शकता.. आणि जी बाजू धरून आपण चाललो आहोत तेच मिळवणे अतिंम सत्य असेल तर .. त्याचा आनंद नक्कीच मिळत राहील आयुष्यात .. पण जर अतिंम ध्येय काय आहे हेच कळायला आयुष्य निघून गेले तर तो माणूस जगलाच नाही म्हणायचे का ? प्रत्येक गोष्टीच्या वेगवेगळ्या बाजू आहेत.. आणि त्याचा विचार करण्यापेक्षा.. आपण आयुष्य ठरवलेले जास्त चांगले नाही आहे का ?