मी खूप लहान असतांना बालसुलभ हट्ट करून आमच्याकडे एक पोपट आणला होता. त्याला काहीबाही बोलायला शिकवण्याचाही प्रयत्न केला. दुर्दैवाने त्याने महिन्याभरातच मान टाकली. (त्याची कबर अजून आमच्या जुन्या वाड्यात आहे. त्या प्रसंगापासून मी कुठलाही प्राणी आपण होऊन पाळण्याचा प्रयत्न केला नाही. कारण भीती- ’पुन्हा पोपट व्हायचा.’
मात्र एक प्राणी नंतर मजेशीररित्या पाळला गेला. मांजर. हीचे नावच होते ’मांजर!’ किटी वगैरे भानगड नाही. (हे नाव आता इतके अंगवळणी पडले आहे की दुसर्या कोणत्याही मांजराला ’मांजर’ म्हणावे वाटत नाही.) तर हे असे मांजर आम्ही पाळले आहे, हा दावा आमच्या कॉलनीतले किमान दहा कुटुंब करू शकतात. या मांजराचे निरीक्षण करता करता मला कधी हा प्राणी आवडू लागला, ते कळलेच नाही. यापुढील वर्णन माझ्या मांजराचे असले, तरी ते सर्व मांजरांना सारखेच लागू पडत असावे, असा माझा कयास आहे.
आमच्या या प्राण्याचे एकंदर व्यक्तिमत्व हे घरातल्या एखाद्या बिघडलेल्या मुलीसारखे असते. केव्हाही वेळीअवेळी घरात येणार. घरातली यच्चयावत माणसे आपल्याकडे पाहत आहेत याची पूर्ण जाणीव असूनसुद्धा खुशाल दुर्लक्ष करून आपल्या आवडत्या जागेवर जाऊन बसणार. दिवसातून दहा वेळा आपले अंग चाटुनपुसून साफ करणार. गल्लीतल्या उनाड बोक्यांना विनाकारण नादी लावणार इत्यादि. सकाळी आणि संध्याकाळी बरोबर चहाची वेळ झाली, म्हणजे मांजर अंगाला आळोखेपिळोखे देत घरात हजर. त्यानंतर जो कुणी उभा असेल, किंवा खुर्चीवर बसला असेल त्याच्या पायाशी लाडीक चाळे, मधूनच एखादे मंजूळ "म्यांव" वगैरे. ही सगळी लाडीगोडी दुधासाठी आहे, हे आपल्याला कळत असूनही आपण उगाच त्याच्या डोक्यावर हात फिरवायचा. कारण एवढी एकच वेळ असते जेव्हा मांजर निवांतपणे आपल्याला डोक्यावर हात फिरवू देते. (मांजराचे डोके विलक्षण मऊ असते.) एकदा आईने दुधाची ताटली पुढे केली, की त्याचा आपला संबंध संपला. नंतर डोळे मिटून दुधावर ताव मारायचा, एकदा मस्तपैकी मिशीवर जीभ फिरवायची आणि मजेत चालू लागायचे. पोट भरलेल्या मांजराचे लाड करणे केवळ अशक्य. तुम्ही तिच्या नुसते जवळ गेलात तरी 'Mind your own business' असा एक तुच्छ कटाक्ष टाकून मांजर चालू पडते.
खरं तर अजून एक दुसरी वेळ असते. हिवाळ्याच्या दिवसात सकाळी आठ वाजता ’गोव्याच्या बीचवर सनबाथ घेत पहुडलेल्या विदेशी ललनेप्रमाणे’ मांजर घराच्या मागच्या ओट्यावर ऊन खात बसलेली असते. अशा वेळी मांजर आपल्या अंगाचे असे काही मुटकुळे करते की तिचा एकही पंजा बाहेर दिसत नाही. आपण तिच्याजवळ जायचे. तिला हे फारसे पसंत पडत नाही, पण उठून दुसरीकडे जाण्याचा अंमळ कंटाळा आल्याने ती आपल्याला हात लावू देते. आपण डोक्यावर हात फिरवावा. ती डोळे बंद करते. आपण मानेवर, पाठीवर हात फिरवल्यावर ती कंठातून ’गर्रर्रर्र....’ असा काहीसा आवाज काढते. हा आवाज पसंतादर्शक असतो की नापसंतीदर्शक, ते मला आजवर कळलेले नाही. थोड्या वेळाने मांजरालाही आपला उबदार हात आवडू लागतो. मग मांजर उगाच मान तिरपी करून "आता इकडे जरा खाजव, कानाच्या मागे.. आता जरा गळ्याला.." असे सिग्नल्स देते. आपल्याला न्हावी असल्याचे फिलींग येऊ लागते.
मांजर प्रचंड स्वार्थी प्राणी आहे. एकदम कामापुरता मामा. पण एवढ्या एकाच गोष्टीसाठी मला मांजर फार आवडते ! मांजर आपल्या नैसर्गिक प्रेरणांशी प्रामाणिक असते. त्याने आपली Dignity सोडलेली नाही. कुत्रा जसा माणसाच्या आहारी गेला आहे, तसे मांजर गेलेले नाही. कुत्र्याच्या डोळ्यात असंख्य वेळा दिसतात, तसे आशाळभूत भाव मांजराच्या डोळ्यात मला कधीच दिसलेले नाहीत. खरं तर मराठी भाषेत ’आशाळभूत’ हा शब्द आपले अस्तित्व टिकवून आहे, तो केवळ ’कुत्रा’ या प्राण्यामुळे !
मांजराने रस्त्यात येणे अशुभ मानले जाते. पण मांजराला जीवे मारले तर फार मोठे पाप लागते, अशी समजूत आहे. खरं तर मांजराचा कुठल्याही देवाकडे वशीला नाही. मांजर कुठल्या देवाचे वाहन नाही. पुराणकथांमधे त्याचे फार उल्लेख नाहीत. तरीही मांजराला मारण्याचा आपल्याकडे इतका बाऊ का करतात, हे मला अजून कळलेले नाही.
कारण काहीही असो, मांजराला मारता येत नाही हे किती चांगले आहे; नाही?
No comments:
Post a Comment