Thursday, August 5, 2010

तो आणि ती

तिला पक्कं माहित होतं की तो भोळसट आहे. जगातल्या प्रत्येकावर सारखंच प्रेम करणारा असा तो...त्याच्या आयुष्यात आपलं स्थान तरी काय याची तिला खात्री नाही....त्याच्या आजुबाजुला वावरणारे सगळेच त्याच्या जवळचे भासतात...मग आपणंही त्याच गर्दीतले एक तर नाही ना असं तिला सारखं वाटायचं.

कोणालाही दुखावू नये हेच त्याचं तत्व....त्याला भेटणारा प्रत्येक स्त्री-प्ररुष/आबालवृद्ध यांच्याशी जणु त्याचे जन्मांतरीचे नाते असल्यागत आपुलकिने विचारपुस हा करतो...भावनाविवश होऊन काहितरी बोलतो...काही आश्वासनं देतो..पण मग ती आश्वासनं पाळतो ही...त्यासाठी पुढचा-मागचा काहीही विचार करत नाही. हे करता करता अनेक नवे लोक जोडतो...असल्या ह्या जगन्मित्रावर तिचं प्रेम जडलंय....पण तिचं प्रेम एकतर्फ़ी तर नाही ना?

तशी ती खुप बोलकी....सतत बडबड करत असते..प्रत्येक सभारंभ तिच्याशिवाय रंगतच नाही. लोकांना कसं खुलवायचं..बोलतं करायचं हे तिला चांगलंच ठाऊक आहे...प्रत्येक पिकनिकपासून ते गणेशोत्सवापर्यंतच्या सगळ्या कार्यक्रमांचं संयोजन ही करत असते. लोकांकडुन काम करवुन घेणं....त्यांना काय हवं नको ते पाहणं हे सगळी काम जणु तिला जन्मजातच येतात. पण तरीही तिला अजुन त्याला काही सांगता नाही आलं...तो कधी काही बोलेल याची तिला खात्री नव्हती...मुळात तिला त्याच्याबद्दलच खात्री नव्हती. आणि ती खात्री करवुन घ्यायची हिंमत तिच्यात नव्हती.

तसा तो तिचा बालपणीचा मित्र...शेजारच्याच घरातला....ती फ़क्त त्याच्यापेक्षा एका महिन्याने लहान. लहानपणापासुन एकत्र खेळले...एकाच शाळेत, कॉलेजात असलेले...एकत्र अभ्यास करणारे...असे ते दोघे.

कॉलेजात असतांना काही मवाली मुलं तिचा पाठलाग करत...ह्याला एकदा कळलं...तो जाऊन त्यांच्याशी बोलला..त्या मवाल्यांनी त्याला चांगलाच चोप दिला...पोलिसकेस झाली....पण हा असा धर्मात्मा की त्याने त्या मवाल्यांना ओळखायल नकार दिला..ती मवाली पोरं एकदम फ़ॅन झालीत त्याची....जिगरी दोस्त...तिच्याकडुन त्यांनी राख्या बांधवुन घेतल्या..माफ़ी मागितली...त्या मवाल्यांना पुढे वडापावची गाडी टाकुन द्यायला ह्याने अनेक खटपटी केल्या..आणि शेवटी ती पोरं मार्गाला लागली..हे त्याचे पहिले समाजकार्य...इथून त्याची गाडी जी सुरु झाली कि आज पाच वर्षांनंतर तर तो तिला भेटेनासा झाला. बघावं तेव्हा घाईत..काहीतरी कामात...ऑफ़िसातुन उशिरा येतो...हल्ली तिच्याशी बोलणंही महिन्यातुन एखादवेळाच होतं.

तिने एकदा हिंमत केलीच.....रात्री ऑफ़िसातुन येत असतांना रस्त्यातच गाठला...
"तुषार .......‍" तिने लांबुन हाक मारली
"जया...." त्याने मागे वळुन पाहिलं..."अगं तु इतक्या रात्रीची कुठुन येतेयेस?"
"येत नाहीये....वाट पाहत होते तुझी...जेवण करुन जरा पाय मोकळे करुन येते असं घरी सांगुन आलीय"
"माझी वाट काय बघायची? अगं फ़ोन करायचा ना मला...बोललो असतो की आपण"
"फ़ोनवर बोलण्यासारखं नव्हतं" अवघडलेपणाला तिने तिच्या फ़टकळपणामधे लपवला.
"असं काय महत्वाचं" त्याला काही कळतच नव्हतं...
"तु लग्नाचा काय विचार केलायेस?"
"काही नाही...का गं? तुला आईने तर नाही ना पाठवलंय माझ्याकडुन माहिती काढुन घ्यायला?"
"नाही...मी स्वत:च आलेय...तुला प्रपोज करायला" पटदिशी ती बोलली.
"हे बघ आताच मी ऑफ़िसातुन थकून भागून येतोय...उगाच पांचट विनोद नकोयेत मला"
"अरे असा काय तु....मी खरंच बोलतेय....तुला काहीच नाही कळत का रे.." तिच्या चेहऱ्यावरचा फ़टकळपणा उतरला होता
"काय?...छे काहीतरीच.......म्हणजे हे कसं शक्य आहे...." तो पुरता गोंधळला
"का...का शक्य नाही?"
"अगं पण हे असं काहीतरी...." त्याला शब्द सुचत नव्हते...त्याने खरंच ह्याबद्दल विचार केला नव्हता.
"असं काहीतरी म्हणजे? तु सांग तुला माझ्याइतकं कोण ओळखतं? अरे मी तुझी बेस्ट फ़्रेंड आहे."
"हो तुच तर आहेस..." हे स्वगत करत होतं...कि तो तिच्याशी बोलत होता ह्याचे त्यालाही भान राहिले नव्हते.
"मग?"
"मग काय...मी बोलतो घरी...सांगतो आईला"
"काय तु आईला सांगशील? काय सांगशील?"
"हेच की तु मला मागणी घातलीस ते"
"मुर्खा....तु आईला हे सांगणार आहेस..."
"मग काय सांगु..."
"आता हे पण मीच सांगु का....तुला स्वत:ची अक्कल नाहीये का?"
"बरं मी सांगतो आईला की मला तु आवडतेस...मग तर झालं?"
"ठीक आहे...पण मी प्रपोज केलंय ते कोणालाही कळता कामा नये..आलं लक्षात?"
"हो...मी बघतो आता काय करायचं ते....एका महिन्यात बार उडवुनच टाकु आपण"

"आई....मला एक बोलायचंय"
"बोल..."
"मला जयाशी लग्न करायचंय"
"काय? तुला लग्न करायचंय? मुर्खा...अजुन सेटल तरी झालास का? अजुन आपण ह्या वन बीएचके मधे राहतोय...आणि म्हणे लग्न करायचंय....बायकोला रहायला जागा नको?"
"जयाच तर आहे....राहिल ती तिच्या आई-बाबांकडे...त्यात काय एव्हढं"
"डोंबलं माझं....अरे तुला काही कळत नाही का अजुन...लष्कराच्या भाकऱ्या भाजतोस आणि एव्हढा लोकांमधे फ़िरतोस...पण साध्या संसाराच्या गोष्टी डोक्यात नाहीत जात तुझ्या.. आधी एक मोठं घर घे...निदान टू बीएचके..मग बघु लग्नाचं"
"कोणाच्या लग्नाचा विषय सुरु आहे?" बाबांनी एंट्री मारली.
"तुमचा चिरंजीव...जयाशी लग्न करायचं म्हणतोय."
"कोण? जया? अरे मग प्रॉब्लेम काय आहे? छानच बातमी आहे की"
"बातमी असु द्या....पण हे सांगा की ती राहणार कुठे? आपलं घर केव्हढं...आधी घर बुक करा कुठे तरी...मग पाहु आपण"

"जया...मी बोललो आईशी काल"
"काय म्हणाली आई"
"म्हणते आधी मोठं घर घे...मग बघु"
"अरे...त्यात काय एव्हढं?"
"म्हणजे...तुला मार्केट रेट माहितेय ना? टु बीएचके म्हणजे निदान चाळीस लाख लागतील"
"अरे...मग आपण दोघं मिळुन घेऊ ना घर....त्यात काय विशेष...आपल्या दोघांना मिळुन मिळेलच कि इतकं लोन"
"अरे हो की....मग जमलंच समज..."

अशा प्रकारे काहीही फ़ारसा त्रास न होता...ती आणि तो लग्नगाठीत बांधले गेले. घर घेतले. पुढे तो हळू समाजकार्यातुन नाव कमावु लागला...कार्यसम्राट हि उपाधी त्याला मिळाली..वर्तमानपत्रांमधे त्याच्या साधेपणाचे किस्से छापुन यायला लागले. त्याने आपल्या पक्षाच्या उमेदवाराला पाठींबा द्यावा म्हणुन मोठमोठी नेतेमंडळी त्याच्याशी जवळीक साधू लागली. हळुहळु त्यालाच निवडणुकीच्या टिकिटांची ऑफ़र यायला लागली. तिला मात्र आता ह्या गोष्टीचा खुप त्रास व्हायला लागला. कुठलेही कसेही लोकं घरात येतात. आणि प्रत्येकाचं चहा-पान करावं लागतं...ऑफ़िसवरुन यावं थकुन-भागुन आणि घरात मरमर काम करावं. वीकएंडला पण आराम म्हणुन नाही अजिबात.

एक दिवस खुपच अति झालं...भेटायला आलेल्या मंडळींसमोर तिने त्याला झापलं. त्याला मात्र कधी नव्हे तो राग आला...सात्विक संतापाने थरथरु लागला तो...त्याने फ़ाडकन तिच्या कानाखाली लगावली. हे जरा अतिच झालं. तिचं आधीच जिवावर आलं होतं..वरुन ही थप्पड...तिने रागाने बॅग भरली आणि निघाली तिच्या माहेरी. सगळी मंडळी नुसता तमाशा बघत होती. काही जास्त न बोलता ती मंडळीही निघून गेली.

दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात बातमी छापुन आली...समाजसेवक म्हणवणाऱ्या तुषार चौगुलेंनी त्यांच्या बायकोला मारहाण करुन घराबाहेर हाकलुन दिल्याची. त्याला आणि तिला सकाळपासुन फ़ोन यायला लागले. तिने तर एक-दोन फ़ोननंतर मोबाईल स्विच करुन ठेवला...पण तो मात्र प्रत्येकाला समजावत बसला...ज्या मंडळींसाठी त्याने बायकोला कानाखाली मारली त्यांच्यापैकीच कोणीतरी बातमी कुठल्या पत्रकाराला दिली होती.

त्याच्यासाठी ही परिस्थिती खुपच गंभीर झालेली होती. दिवसरात्र झोप नाही...नुसते विचार डोक्यात फ़िरताहेत. तिला फ़ोन केला तर तिचा फ़ोन बंद. मग मात्र तिच्या घरी जायचं त्याने ठरवलं. तिने मात्र घरात घेतलंच नाही. उगाच तमाशा नको म्हणुन हादेखील निमुट निघाला.

सैरभैर मनाने इकडे तिकडे फ़िरायला लागला...खुप दिवसांनी असा एकटाच स्वत:बद्दल विचार करत हिंडत होता. एक वेळ आली की विचार नकोच करायला.... जे वाट्टेल ते करु असा निश्चय करुन तो पुन्हा हिंडायला लागला..ऐरवी ऑफ़िसला जायला घरासमोरुन थेट बस...त्यामुळे चालायची सवय नाही...ठाण्यात असुन लोकल ट्रेनचा प्रवास नाही. आयुष्य कसं अगदी साधं सोपं होतं. जगण्यासाठीची लोकांची धडपड नव्यानेच त्याला दिसत होती. आजवर जी मंडळी भेटलीत ती सगळी त्यांची कामं घेऊन यायची..असं वाटायचं की काहीतरी प्रोसिजरल गोष्टींमुळे छोटी-मोठी कामं अडली आहेत..त्यामागे त्यांच्या आयुष्याची भ्रांत कधी जाणवलीच नव्हती. आणि आज ह्या मनस्थितीत मनावरील झापड दुर झाले होते. हातगडी ढकलणारा मजुर...बुटपॉलिश करणारी मुलं...मासळी विकणाऱ्या बायका...हातपाय तुटलेला भिकारी...भाजीपाला विकणारा भैय्या हे सगळेच जवळचे वाटत होते. असं का वाटतंय हे त्यालाही कळत नव्हतं पण कदाचित जगातल्या सगळ्या धडपड करणाऱ्यांशी त्याला आपुलकी वाटत होती.


त्याला घरातुन हाकलल्यानंतर तिला मात्र खुप विचित्र वाटत होतं...चारचौघांसमोर कानाखाली त्याने मारली ही गोष्ट जणु तिच्या डोक्यातुन निघुनच गेली होती..उलट तिलाच आपण काहीतरी वाईट केल्यासारखं वाटायला लागलं. अगदीच राहवलं नाही म्हणुन तिने त्याला फ़ोन केला. त्याने मात्र उचललाच नाही...पॅंटच्या खिशात सायलंटवर असलेल्या फ़ोनचं त्याला भानंच नव्हतं. मग तिने घाबरुन फ़ोन केला तर घरीही नाही....मग तीन-चार मित्रांकडे केला तर तिथेही नाही. मग मात्र ही बावरली. सैरभैर झाली....आणि घरातुन त्याला शोधायला निघाली. मनच ते...काहीही विचार करायला लागलं...दर पाच-एक मिनिटांनी फ़ोन करत होती. तो मात्र अजिबात उचलत नव्हता.

ती रेल्वे-स्टेशनकडे निघाली. अंतर्मन सांगत होते की तो रेल्वेस्टेशनच्या आसपासच असावा...कसं काय ते माहीत नाही...पण वाटतं मात्र तसंच होतं...आणि तोही खरोखरच रेल्वेस्टेशन जवळच होता. प्लॅटफ़ॉर्मची सैर करावी म्हणुन सहज स्टेशनात घुसायचा प्लान होता. तिकिट काढायचं भान तर नव्हतंच.

जाऊन सहज फ़लाटावर उभा राहिला...दुपारच्या वेळीही गर्दी होतीच...तीही त्याच फ़लाटावर पोहोचली होती...तिने त्याला लांबुनच पाहिले..त्याला हाक मारत होती...पण इतक्या गोंगाटात तिचा आवाज पोहोचतच नव्हता....तिने पाहिले...त्याच्याजवळ टीसी येतोय ते...टीसी त्याला काहीतरी विचारत होता..आणि हा मात्र पुरता गोंधळला होता...तिला त्यापरिस्थितीतही हसु आलं त्याच्यावर....पटकन तिने कुपन्स पंच केले....आणि पुन्हा त्याच्याकडे निघाली...बघते तर काय हा हिरो...टिसीशी भांडत होता...आयुष्यात प्रथमच तिने त्याला असं भांडतांना पाहिलं...टिसीबरोबर असलेल्या एकाने त्याला धरले आणि त्याला कुठेतरी घेऊन जायचा प्रयत्न करायला लागला. रेल्वे पोलिस असावा बहुतेक तो..त्याने हात झटकला आणि पळू लागला...तेव्हढ्यात फ़लाटावरुन एक लोकल नुकतीच सुरु व्हायला लागली होती...त्याने ती चालती गाडी पकडली....गाडी थोडी पुढे जाताच त्याला ती दिसली...तिने कुपन हातात धरली होती...त्याने काहीही विचार न करता चालत्या गाडीतुन उडी मारली....तीही विरुद्ध दिशेने...

तिच्यासमोर तो फ़लाटाच्या आणि रेल्वेच्या गॅपमधे जाऊन पडला...ती काहीही करु शकत नव्हती..गाडी वेगाने निघुन जात होती...तोंडातुन एक शब्दही निघत नव्हता...लोकं ओरडत होते. बेशुद्ध होऊन ती जागेवरच कोसळली...

डोळे उघडले तेव्हा ती तिच्या घरीच होती...सकाळ झालेली होती...कोवळी सुर्यकिरणं खिडकीतुन येत होती..किचनमधे वर्दळ तिला जाणवत होती..अंगात त्राण नसल्यागत ती नुसती पडुन राहिली..तितक्यात आई आत आली...
"अगं उठ...आठ वाजलेत सकाळचे...आज ऑफ़िसला नाही का जायचं?"
"काय?" अशा परिस्थितीत आई ऑफ़िसला जायची गोष्ट कशी करु शकते...तिला कळ्तच नव्हतं.
"’काय काय’... काय करतेस आधी उठ...आणि आज ऑफ़िसवरुन वेळेवर ये...तुषारचे आई-बाबा येणार आहेत ना आज लग्नाची बोलणी करायला?"
"काय?" गोंधळलेल्या चेहऱ्यावरचे तिचे भाव बदलत गेले आणि तिच्या चेहऱ्यावर नकळत एक हास्य फ़ुलले..

No comments:

Post a Comment