Monday, January 2, 2012

बालवाडी

तुम्ही ज्यावेळी पहिले पाऊल ठेवता शाळेमध्ये त्यावेळी तुम्हाला काय वाटले ते कधीच कुणाला आठवत नाही बहुतेक... खूप लहान असतो आपण आणि घाबरलेले पण...इतकी सगळी आपल्या वयाची मुले- मुली, आईला सोडून कुठल्या तरी अनोळखी माणसाचे आपण सगळे ऐकायचे आणि त्याही पेक्षा आपल्या वयाची इतकी मुले आहेत म्हणजे नेहमी आपल्याला हवे तसे होणार नाही याची जाणीव...! पण हळूहळू जसे तुम्ही शाळेला जाऊ लागता तसे कळायला लागते कि आपले आयुष्य हे कदाचित हळूहळू आपल्या हातात यायला लागेल.. शाळेत बाईंचे आणि घरात आई बाबांचे सारखे ऐकावे लागणार नाही.. कधीतरी माझे पण ते ऐकतील आणि त्यासाठी शाळेत गेले पाहिजे.. काही वर्षे जातात मग लक्षात येते कि नुसते शाळेत जाऊन शहाणे होऊन चालत नाही तर तो शहाणपणा विकावा लागतो आणि ज्याच्या शहाणपणाची किंमत जास्त त्याच्या शब्दांना किंमत पण जास्त... ! आणि मग लक्षात येते कि शाळेत असतात वाटेल होते कि शाळा संपली कि आपण खूप शहाणे, सगळ्याची उत्तरे असलेले माणूस होऊ जसे आई बाबा आहेत.. पण कॉलेज लवकरच शिकवते कि हे सगळे मृगजळ आहे.... आणि त्यातले आई बाबा शाळेत असतानाचे जे आपल्याला माहित होते ते फक्त चांगले खुश दिसणारे आई बाबा होते.. पण त्यांनाहि पण खूप सारे प्रोब्लेम्स होते.. जे त्यांनी कधी आपल्याला सांगितले नाहीत... त्यांना पण त्यांच्या आई बाबांची आठवण यायची पण त्यांनी कधी सांगितले नाही...त्यांना पण आपल्यासारखे घाबरायला व्हायचे, त्यांना पण सगळे निर्णय घेता येत नाहीत... त्यांचे आयुष्य पण पूर्णपणे त्यांच्या मनाप्रमाणे चालत नाही.... आणि मग लक्षात यायला लागते कि शाळेत असताना आपण समजलेले आयुष्य होते ते सगळे क्षणभंगुर होते... जसे जसे तुम्ही मोठे होता तसे बर्याच गोष्टी बदलत जातात... आणि त्याहूनही तुम्ही बदलता... तुमच्या समाधानच्या आनंदाच्या व्याख्या बदलतात... कॉलेज पूर्ण करून मोठे व्हायची स्वप्न पाहिलेले आपले मन एकदम खट्टू होते ज्यावेळी त्याला कळते कि कॉलेज पूर्ण झाले आहे म्हणजे फक्त सुरुवात आहे ... एका नव्या आयुष्याची... जिथे फारसे काही आपल्या हातात नाही आहे अन म्हटले तर सगळे काही आपल्या हातात आहे...! मग कधी कधी बाहेर मस्त पाऊस पडत असताना आपण खिडकीत उभे राहून बाहेर रस्त्याकडे बघत असतो.. कुठेतरी आपल्याच लहानपणीचे दिवस आपण आठवत असतो... पावसात भिजताना ... आणि मग वाटते कि कधीतरी मृगजळासारखे दिसणारे हे आयुष्य जगणे कधी सोपे होणार आहे का? कधीतरी आयुष्याचा अर्थ कळणार आहे का आपल्याला... का आपण पण असेच पुढे सरकत जाणारे प्रवासी आहोत बाकीच्या असंख्य लोकांबरोबर.... ज्यांना उमगलेले नाही आहे कि त्यांना काय हवे आहे आयुष्यामध्ये... ! आणि मग वाटते कि तो शाळेचा पहिला दिवस परत एकदा आपण जगायला लागलो आहोत... अनोळखी लोक, वेगळाच रिंग मास्तर आणि सतत काहीतरी दाखवून द्यायची शर्यत.... ! बाराखडी, पाढे, वाचायला, लिहायला येणे या गोष्टींच्या व्याख्या बदलतात प्रत्येकवेळी फक्त... !

No comments:

Post a Comment