ती ऑर्कुटवर गावली...एक नंबर डीपी व्हता..लिवायची बी मस्त...आयला माझ्या जे मनात तेच तिच्या पोष्टात असायचं...इचार करायचो आपण कधी असं लिवायला लागू..तिचा परत्येक पोश्ट डोळ्यात प्राण आणुन वाचायचं आणि मगच झोपायचं हा आपला शिरस्ताच होऊन बसला..
सहमत आहे..
+++१०००
असं तिच्या पोश्टावर लिहायचं....बाकी इषय समजो न समजो..पण ति नेहेमीच धन्यवाद द्यायची..कसं मुठभर मांस चढायचं अगांवर...एकदा
हिम्मत करुन फ़्रेंड रिक्वेश्ट टाकली...आणि आयला.... तिने ऍक्सेप्ट बी केली.
मग तिचं स्करॅपबुक वाचायला सुरुवात केली....साले कोण कोण भामटे तिला प्रेमकविता पाठवत होते..प्रत्येकाच्या प्रोफ़ाइलवर जाऊन त्यांना
शिव्या घातल्या...
एकाने वर तोंड करुन इचारले की तु काय तिचा भाऊ काय?
म्हटलं साल्या...भाऊ असशील तु...तुझा बाप..आपण तिचा फ़्रेंड आहे..फ़्रेंड. परत असल्या छिछोऱ्या कविता लिवल्या ना तिला तर बघ माह्याशी
गाठ आहे...घरीत घुसुन थोबाड रंगवेल थुतरीच्या.
पण त्यालाबी माज लई...म्हणे तुला कविता येत नाही म्हणुन चिडला का...हिंम्मत असंल तर ये घरी म्हणे...आधी मी कोण ते शोध म्हणे....
साला फ़ेक प्रोफ़ाइलचा..ह्या फ़ेकचा सोक्षमोक्ष लावायचाच एकदाचा...ठरवुन टाकले..पण आता करणार तरी काय...एका क्यॅम्पुटरवाल्या दोस्ताला इचारला..तो म्हणला की त्याचा एक दोस्त आहे..सायबर क्रायम डिपार्टमेंटात..हे पोलिसांचं काहीतरी नवीनच डिपार्टमेंट आहे म्हणे तिथे धरतात म्हणे असल्या चोट्ट्यांना.
गेलो मग तिथल्या डिपार्टमेंटात...आता सांगायचं तरी काय? त्याला म्हणलं एका माझ्या मैतरणीला ऑर्कुटवर स्करॅप करुन लई तरास दिला जातो एका प्रोफ़ाइलकडुन..काय तरी करा राव..तर ते म्हणतं कसं...असल्या फ़ालतुगिरीसाठी येळ नाही ..तिला म्हणावं तरास व्हत असंल तर हो डिलीट ऑर्कुटावरुन..असली नसती लफ़डी कशाला पायजेल?
म्हणलं साहेब काही चिरिमिरी घेऊन करा की मदत गरिबाला..अहो ती ऑर्कुटवरुन गेली तर काय व्हायचं माझं? कसं सांगु आता तुमाला..मंग सगळी श्टोरी सांगितली....आयला पण ते बेनं हसायलाच लागलं..दोनचार हापिसरांना बोलवुन लै दात काढलं साल्यानं..आता पोलिस व्हता म्हणुन म्या गप राहिलो...ड्युटीवरच्या पोलिसाला आपन काही बोलत नाही...आयला साल्यांना काय काम नव्हतं वाटतं...लई घेतली त्यांनी माजी..१ तास टींगल केली...आणि मग म्हणे की अरं जाऊ दे की ही इंटरनेटची लफ़डी...दे सोडुन.
पण मी बी असा माघार जाईल का..म्हटलं की माझं प्रेम सच्चं आहे...असा कोणी तिला तरास दिला तर म्या गप बसणार न्हाई. तुम्हाला नसंल मदत करायची तर जाउ द्या.म्या माझं बघुन घिईन. निघालो मंग म्या तिथुन..माझी पाठ वळते ना वळते तर म्हणतं कसं ते हापिसर...म्हणे खऱ्या लाईफ़ मंधी लव्ह करायची हिंम्मत नायी म्हणुन हे असलं परकार वाढत चाललीयात.
आयला आमच्या खऱ्या लायफ़ात अशी कोणी भेटली असती तर.....आयला खरंच की...आजवर कुठल्या पोरीशी बोलायची हिंम्मतच झाली कुठे?
मग ठरवलं हीच्याशी बोलायचंच...तडक घरी आलो आणि एक स्करॅप टाकला तिला...म्हटलं नमस्कार...काय म्हणताय? कसं काय चाललंय?
एका मिनिटात उत्तर आलं की...म्हणली की मजेत आहे..म्हणे की या चॅटवर..
आयला आता चॅटवर तर कुटं दिसत नव्हती...आता करायंच काय..तर तिचाच आला पिंग..म्हणे....हाय..मंग ह्या बी हाय म्हणलं..मंग नमस्कार केला. तर तिने माकडांच थोबाड असलेलं चित्र पाठवलं...दात विचकत होतं ते थोबाड..म्या म्हणलं आहे काय हे? तर म्हणे श्मायली की
काय..तिला म्हणलं की तुला सॉलेट नालेज हाये बॉ..
लगेच स्वॉरी बोललो...अहो अचानक एकेरीवर आलो...
तर ती म्हणली चालतंय की एकेरी...आमच्या कंपनीत सगळे एकेरीच बोलतात.
पण मग काय बोलाव सुचलंच नाही...आणि दोन मिनिटात लाईट गेली...बोंबला.
---------------------------------------------------------
टीव्हीवर काटा आणि पुर्ती ह्या प्रसिद्ध उद्योगपतींची जाहिर मुलाखत सुरु होती. चनडीटीव्हीचा संपादक हेकर चुप्ता त्यांना प्रश्न विचारत होता. टायकोटवाला प्रेक्षकवर्ग भारावुन ती मुलाखत ऐकत होता..मधेच एखाद्या टुकार वाक्याला टाळ्यांचा प्रचंड कडकडात होई..
एकतर आधीच टिव्हीचा व्हॉल्युम जास्त...त्यातुन रिमोट दुर...इथे ऑर्कुट कम्युनिटीवरील भांडण हातघाईवर आलेलं...समोरच्याला शब्दात पकडायचं...त्याचा कमाल अपमान करायचा हे काही साधं काम नाही. प्रचंड concentration ची आवश्यकता असते. पण टिव्हीवरील त्या मुलाखतीने आणखीच चिडचिड व्हायला लागली होती.
हे उद्योगसम्राट् म्हणत होते की त्यांच्या उद्योगांना मिळालेली जमीन गेल्या पन्नास वर्ष पडीक होती. छोटे लोकल राजकारणी मुद्दाम आपलं उपद्रवमुल्य सिद्ध करायला विरोध करतात. आम्ही ह्यांच्यापुढे झुकणार नाही...वगैरे वगैरे.
च्यामारी ह्यांच्या..MIDC च्या इतक्या जमीनी रिकाम्या आहेत..तिथे उभारा ना प्रकल्प..आयला आम्ही आमच्या शेतजमीनी कशाला देऊ? असतील पडिक...पण ह्यांच्या बापाच्या आहेत का? आमच्या पुर्वजांच्या आहेत. नाही विकायच्या.
आयला टॉपिक मस्त आहे..टाकतोच कम्युनिटीवर.."उद्योगांसाठी शेतजमीनी संपादित करणे योग्य आहे का?" मस्त...ऐनवेळी हा संपादीत शब्द आठवला..मस्त टायटल आहे. एका दिवसांत सेंच्युरी मारणार..१००%.
काल तो टॉपिक टाकला होता...एकलव्याचा अंगठा कापणारे द्रोणाचार्य गुरु म्हणवुन घ्यायच्या लायकीचे होते का?...सुसाट धागा होता...एका तासात सेंच्युरी मारली...पण मग झाल्या मराठा-ब्राह्मण शिव्या..मग धागा बंद केला नियंत्रकांनी.
खरंतर किती मजा येत होती...आणि तीदेखील तावातावाने पोस्ट्स लिहित होती..किती बरं वाटतं तिचे पोस्ट्स वाचुन..खरंच..पण तो अनाडी...सारखा सहमत आहे...+१००० लिहित असतो...त्याला बाकी काही लिहिता येत नाही..उगाच येतो तिथे..मवाली कुठला..तिने पण त्याला फ़्रेंडलिस्ट मधे कसं ऍड केलं कळत नाही...मी इतक्या कविता लिहिला तिला..माझ्याकडे साफ़ दुर्लक्ष आणि तो फ़्रेंडलिस्ट मधे? त्या मवाल्याने तर काल मला धमकीही दिली...बरं झालं माझे खरे डिटेल्स नाहीयेत प्रोफ़ाइलवर...नाहीतर काय झालं असतं काय माहित..!! त्याचा बंदोबस्त करावाच लागेल.
-----------------------------------------------------
हे बेनं लईच तिरकं दिसतंय....सालं मलाच फ़्रेंड रिक्वेश्ट टाकतंय...काय कावा असंल ह्याचा बरं?
ह्याची रिक्वेश्ट नाही ऍक्सेप्टली तर ह्या पळपुटा आहे असा म्हणल तो...आणि जर केली तर तिला काय वाटेल? तीला रोज त्रास देणारा माझा फ़्रेंड...!!
आयला घड्याळवाल्या साहेबाचा शिष्य दिसतोय...काय बी गुगली टाकलीय साल्यानं....आता कसं करावं बॉ..च्यामारी लाईट गेली...बोंबला..!!!
---------------------------------------------------
आयला ह्याचा स्क्रॅप...बगुया तरी काय लिवलंय..
च्यामारी...!! असं कसं झालं? अर्रर्र..घोटाळाच झाला मना की..!! फ़्रेंड रिक्वेश्ट ऍक्सेप्ट केलीच पायजे आता तर..!!
एका मिनिटापुर्वीच स्क्रॅप आला...म्हंजे आनलाइनच असल की..हे काय ग्रीन कलरच दिसतोय..पिंग करतो लगेच..
"काय मॅडम..काय फ़िरकी घेताय माजी..हे असलं पोराचं अकाऊंट बनवुन सौतालाच स्क्रॅप करताव तुमी..ह्याला काय अर्थ?"
"हेहेहे..त्याचे काय आहे...मैत्रीणींवर इंप्रेशन मारायला...त्यांनाही कळु देत की मी किती फ़ेमस आहे..किती मुलं माझे दिवाणे आहेत."
"म्ंजे?...समद्या कविता तुमच्याच फ़ेक अकाउंटावरुन व्हत्या की काय?"
"सगळ्या नाही...फ़क्त ह्या अकाउंट वरुन..उपयोगात येते हे अकाउंट..कधी कधी.. बरेच दिवस कोणी स्क्रॅप करत नाही ना..मग मीच स्वत:ला स्क्रॅप करते.."
"भारीच प्रकरण आहे बॉ तुमचं..आम्ही तर असे सादी सुदी गावठी लोकं..फ़सलोच की.. स्वॉरी बरं का..तुमाला स्क्रॅपवर काईबाई बोललो..कविता भारी आहेत बरं का..तुमी सौताच लिवता ह्या की..?"
"ढापलेल्या आहेत हो.."
"ढापायला बी अक्कल लागती...भारी ढापल्या बरं का..तुमचं बाकी नालेज बी लय भारी आहे...पन का हो..असं दोनी अकाउंटवरुन एकमेकाला इरोधी लिखान करताव..म्या असतो तर दुसऱ्या अकाउंटवरुन नुसता ’सहमत आहे’ असं लिवलं असतं"
"त्याचे काय आहे....की विषय पेटला की मजा येते..म्हणुन दोन्ही बाजुने लिहायचं..वाद-विवाद-चर्चा ह्यात मस्त टाइमपास होतो"
"येक इचारु का?"
"विचारा की"
"तुमाला मी फ़्रेंड रिक्वेश्ट टाकली आणि तुमी बी ती लगेच ऍक्शेप्टबी करुन टाकली...तुमची फ़्रेंड लिश्ट बी लयच मोठी आहे..तुमी असं कोणालाबी ऍड करुन टाकता का?"
"हो..त्यात का विशेष?"
"लय बोल्डं आहात बॉ तुमी..आयला मी पोरगा असुन्बी घाबरतो"
"हेहेहे"
"बरं बरं...जाते मी आता...रात्र झालीय खुप..चॅट करायची असेल तर ह्याच अकाउंट वर पिंग करत जा आणि स्क्रॅप पण इथेच टाकत जा..कोणाला संशय येणार नाही."
"हो हो...कळलं आता..ह्याच अकाउंट वर टाकेल"
"bye..gn..tc"
"बाय...gn, tc मंजे?"
"म्हणजे गुड नाईट..टेक केअर"
"अच्छा अच्छा..तसं का..बरं बरं...म्या नवीन्च हाय ऑर्कुटावर..चॅटची सवय नाई ना.. तुमालाबी ते gn..tc"
"शिकाल हो सगळं..चला ओव्हर ऍंड आऊट"
आयला गेली की..लय भारी पोरगी हाय..पण ती असं का म्हनली कि ’कोणाला संशय येणार नाही’? आयला म्हणजे तिच्या सायड ने बी लाईन किलिअर आहे..तिला बी आवडतं की माझ्याबरोबर चॅट करायला..इट्टला..म्या स्वप्नात तर नाय ना रे देवा?
--------------------------------------------------------
भोळसटच दिसतोय पक्का..कसा गंडवला...आता टाक म्हणा तुझे स्क्रॅप..तिच्यापर्यंत जाणारच नाहीत, आणि तीने याला स्क्रॅप केले तर मी ते वाचु शकतो...हेहेहे..मला माहिती होतं...मी ग्रेट आहे..कोणाचापण गेम करु शकतो..हा हा हा..आणि हा बसेल आता..मला पण ’सहमत आहे + १०००’ करत..येडछाप साला.
---------------------------------------------------------
दिवसेंदिवस हा गावठी माकड जास्त सोकावत चाललाय. ह्याला इतकी ढील दिली, तर आता लाडात यायला लागलाय. प्रश्नही जास्तच विचारायला लागलाय. ह्याची मस्ती एकदिवस उतरावीच लागेल. येऊ दे ह्याला आज चॅटवर बघतोच आज याला. घ्या...आलंच हे मर्कट.
"नमस्कार मॅडम"
"हॅल्लो"
"कसं काय चाललंय?"
"चाललंय नेहेमीसारख"
"म्या काल रात्रभर इचार करत व्हतो..."
"कसला?"
"आता लय झालं हे चिट-चॅट. आता आपण भेटावं आपण"
"का? भेटायची काय गरज आहे?"
"हा काय प्रश्न हाये? समद्या गोष्टी काय चॅटवरच बोलायच्या की काय?"
"जे असेल ते बोला की चॅटवरच..एकदम भेटायचं म्हणजे.."
"घाबरता कशाला...आपल्याला एक जागा माहित आहे...कोणाला कळनार नाय आणं संशयबी येनार .."
"म्हणजे?"
"मंजे आपल्याला जरा प्रायव्हेटली बोलता येईल"
"शीऽऽऽऽ.. तुम्ही स्वत:ला कोण समजता? आणि मी अशातली मुलगी नाही बरं का. थोडे तुमच्याशी चॅट केले तर तुम्ही लगटच करायला लागलात. तुमच्यासारख्या गावठी पोरांशी बोलण ही चुकच झाली माझी..नाहितरी तुमच्यासारखे खुप पाहिले आहेत...बोट दिलं तर हात पकडतात...पोरगी ’हाय’ काय म्हणाली तुम्ही डायरेक्ट संसाराचीच चित्र पाहतात. माझंच चुकलं"
"आवं मंजे तुमच्या सायड ने कायच नाय वाटत तुमाला माज्याबद्दल..मंजे.."
"आधी मला तुम्ही साधे-सुधे वाटले होते...पण आता कळलं तुमचं सारं खरं रुप. हिच अपेक्षा करायला हवी होती मी एका गावठी-अडाणी माणसाकडुन. ह्यापुढे माझ्याशी बोलायची हिंमत केलीत तर खबरदार...सांगुन ठेवते तुम्हाला. आणि मला तुमच्या बद्दल काहीही वाटत नाही सांगुन ठेवतेय. तुमच्या सारख्या गावठी माणसाला कसे कळणार म्हणा मित्र-मैत्रिणी काय असतात ते..तुम्हाला फ़क्त ’तेच’ नाते कळतं"
बंद करुन टाकली मी चॅट..संताप येत होता. जास्त वेळ चॅट केली असती तर नेहेमीच्या शिव्या बाहेर येतील आणि मी खरंच मुलगी नाही याचा त्याला संशय येईल. ब्लॉकच करुन टाकला त्याला. साला स्वत:ला समजतो काय? भेटायच्या गोष्टी करतो. ते पण तिला?
----------------------------------------------------------------------
आयला हि पोरगी सौताला समजते तरी काय? नुसतं भेटु म्हनलं तर कायबाय बोलली. मला गावठी-अडाणी बोलली. तिला काय वाटतं की आमच्या सारखा अडानी असा गप बसेल? ही कोन अशी महारानी लागुन गेलीय. आयला इतके दिवस नुसती गुलुगुलु बोलत होती..आनि आज भेटायचं म्हनलं कि पेटलीच..नुस्ता टायमपास करत व्हती मंजे माह्याशी..आयला हिच्या..हिला असा सोडत नाय मी. आता बगतोच हिच्याकडे.
-------------------------------------------------------------------------
बगा...इथे कम्युनिटीवर कसं फ़ेक प्रोफ़ाइलबद्द्ल लिवतेय..की घाबरट असतात फ़ेक प्रोफ़ाइल म्हणे..मंग सौताचे फ़ेक प्रोफ़ाइल म्ंजे काय पराक्रम का? हिचे बिंग फ़ोडलेच पायजे..माज्याकडे सगळ्या चॅटांची हिश्टरी हाये..कॉपी पेश्ट्च करुन टाकतो. सगळीकडं छि-थु जाली नाही ना ह्या बयेची तर नाव बदलुन टाकन.
कुटे गेला तो चॅट..हा सापडला..आता हे कॉपी..आणि हे पेश्ट आणि हे सबमिट..आता बगु कशी मजा येती ती.
अर्रर्र...लोकांना काय कळंल ती पोरगी कोन ते..मला अजुन एक पोश्ट लिवायला हवा..
"हि मड्डम..जी इतकं फ़ेक प्रोफ़ाइलबद्द्ल लिहुन राहलीय..ती सौता एका मुलाचं फ़ेक प्रोफ़ाइल बनुन लिहित असते आणि हे दोन्ही प्रोफ़ाइल्स ह्याच कम्युनिटीवर हायती. विशय पेटवावा..कधी शिवीगाळ करावी म्हनुन हा प्रकार ही बया करत असत..आणि इथे लोकांना शाणपणा शिकवतेय. ती वरची चॅट जी लिवलीय ना...ती तिच्या फ़ेकबरोबरची माजी चॅट आहे..बगा आता तुमीच ठरवा काय ते."
आयला बांबच फ़ोडला की मी..हिचे दोन्ही प्रोफ़ाइल लय फ़ेमस होते...आता त्वांड दाकवायला जागा राहणार नाही तिला.
----------------------------------------------------------------------------
आई शप्पथ..ह्या अडाण्याने काय मुर्खपणा केला हा...गेलो आता वाट लागली..तिला तरी नक्कीच कळली असेल माझी चालुगिरि..आता काय करावं..बरं झालं तरी की हे फ़ेक अकाऊंट होतं माझं. आता पर्याय एकच डीलीट जीमेल अकाउंट. आताच पळ काढतो इथुन.
-----------------------------------------------------------------
हिचा रिप्लाय आला बगा...तेबी खऱ्या प्रोफ़ाइल वरुन..म्हणते कशी की
"मी खरी प्रोफ़ाइल आहे..तुम्ही ज्या मुलाच्या प्रोफ़ाइलबद्दल लिहित आहात त्याचा माझ्याशी काही संबंध नाही...उलट तो मला गेले वर्षभर कविता पाठवुन त्रास देत होता. आणि मी तुमच्या फ़्रेंडलिस्ट मधे आहे..एकदा माझ्याशी बोलायचं तरी होतं तुम्ही. तुमच्याकडुन हे अपेक्षित नव्हतं. ह्या प्रकाराबद्दल मी मालकांकडे तक्रार करणार आहे. त्यांना फ़ोन करुन मी खरे प्रोफ़ाइल असल्याची त्यांना खात्री पटवुन द्यायला मी तयार आहे..हवं असल्यास व्हिडियो चॅट करु शकते आणि माझे आयडेटीटी कार्डही पाठवु शकते."
आयला हि खोटी प्रोफ़ाइल आहे हे बोललंच कोन..ह्या तर म्हणलो की दुसरं पोराचं प्रोफ़ाइल खोटा आहे..देतोच आता रिप्लाय
"मड्डम..त्या पोराच्या प्रोफ़ाइलने जर अशी व्हिडोयो चॅट केली तर इश्वास बसल आमचा..किती बी गावठी-अडाणी असलो..तरी अक्क्ल हाय आमालाबी..समजलं ना?"
-------------------------------------------------------------------
अरेरे विषय खुपच पेटलेला दिसतोय..सगळीकडुन माझी डिमांड वाढलीय. पण मी आता ते प्रोफ़ाइल तर डिलीट केलंय. बरंच झालं ते म्हणा एका प्रकारे..आता कम्युनिटीचा मालक म्हणुन लिहितो काहितरी. अरे..हिचा स्क्रॅप आला. काय म्हणते बघु तरी.
"नमस्कार..ह्या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही..कोणीतरी माझ्याशी खोडसाळपणा करतंय. प्लिज तुम्ही याची दखल घ्या, मी असली मुलगी नाही...माझे एकही फ़ेक प्रोफ़ाइल नाही. मी इतक्या वर्षापासुन ह्या कम्युनिटीवर आहे. प्लिज मदत करा तुम्ही".
अरेरे बिचारी...काय करुन बसलो मी हे. उगाच तिला किती मनस्ताप दिला. आता तिला यातुन बाहेर काढायची जबाबदारी माझी आहे. तिच्या स्क्रॅपचे आधी उत्तर देतो.
"नमस्कार...तुम्ही टेंशन घेऊ नका..नक्की काय प्रकार झालाय ते माझ्या लक्षात आलंय. मी त्या दोघांनाही बॅन करतोय कम्युनिटीमधुन. तुम्हाला कोणी त्रास दिला तर मला सांगा..ह्या नंबरवर फ़ोन करा मला. माझे सायबर क्राइम डिपार्टमेंटमधे काही मित्र आहेत तुम्हाला नक्कीच मदत करेन. बाकी काळजी करु नका. मी सगळं बघुन घेतो."
आता कम्युनिटीवर जाऊन तिची बाजु घेतो...आणि त्या अडाण्याला आधी बॅन करतो, माझे फ़ेक प्रोफ़ाइल तर डिलीट झालेच आहे..काही दिवस दिसत राहिल म्हणा ते...त्यालाही बॅन करुन टाकतो.
हम्म्म..केला पोस्ट...आणि त्यापोस्टवर अधिक गदारोळ करणाऱ्यांवर कारवाईची धमकीही दिलीय. त्या गावठयाचा चांगलाच पोपट झालाय ह्या प्रकरणात. बिच्चारा..!! तेलही गेले आणि तुपही.
आणि मला? मला बघा फ़्रेंड रिक्वेस्ट आलीय तिच्याकडुन...हा हा हा...मी ग्रेट आहे. कुठे थोडा चुकलो तरी शेवटी माझाच फ़ायदा होतो. पण आता अजिबात चुक होणार नाही.
----------------------------------------------------
च्यामारी...आज एक वरिस झालं..ते प्रकरण...लईच मोठा मामा केला माजा त्या थुतरीच्याने.. आन कुठं गायब झालं ते बेनं कळायला काय बी मार्ग नाय...कधी भेटला तर साल्याला असा चोप देइल की बस्स...बापजन्मात कधी कोणाच्या नादी लागायचा नाय.
आयला हे गुगल चॅट, दोस्त एक मिनिट शांत बसु देत नायत...बगु बरं काय म्हणतोय हा..
"का रे...काम्हुन सारखा पिंगुन राहिला बे?"
"अरे बातमी कळली का तुला?"
"कसली बातमी"
"अरे त्या कम्युनिटीचा मालक..आणि तीचे लग्न ठरलेय.."
"कोणे ती?"
"अरे तीच..जी फ़ेक प्रोफ़ाइल आहे म्हणुन तु बोंब मारलीस आणि तुला हाकलुन लावला ती"
"च्यामारी..दोन माकड्यांच्या भांडणात..लोणी बोक्यानं पळवलं म्हणायचं की"
"काय?"
"नाय नाय काय नाय.."
आयला जर मी डोकं ताळ्यावर ठेवुन वागलो असतो तर आज माझ्या लग्नाची बातमी आली असती. आयला हे गाणं काय भारी आहे राव..
ऽऽ....Give me some sunshine..give me some rain..give me another chance i wanna grow up once again..ऽऽऽ
चला पण त्यानिमित्ताने पेटुन इंग्लिश तरी शिकलो थोडेफ़ार..Better Luck Next Time म्हणायचे आता.
eek number gosht aahe laaich bhari..
ReplyDeleteawadali aplyala..