Saturday, November 21, 2009

कुंठीत...!!!

खिडकीतुन येणारे कवडसे आता प्रखर किरणं बनुन आता डोळ्यांना जाचु लागले...डोकं जाम झालं होतं...पण आता तिथे पडुन राहणं शक्यच नव्हतं...खिडकीशेजारी झोपायची सवय, रात्रभर येणाऱ्या गार वाऱ्याच्या झुळका आणि रात्री कितीही वाजेपर्यंत धिंगाणा घातला तरी सकाळी ९ वाजता उठवणारी सुर्यकिरणं.
पुण्यातली रेव्होसॉफ़्ट जॉईन केल्यापासुनच असा दिनक्रम होता...गेली पाच वर्ष असंच सुरु होतं. दिवसभर ऑफ़िसमधे मरमर काम...मग रात्री मित्र-मैत्रीणींबबरोबर पब-डिस्क...घरी किती वाजता परत यायचे याची शुद्ध असायचीच कुठे? पुण्यात आल्या आल्याच स्वत:च फ़्लॅट बुक केला होता..कंपनी विनाव्याजी कर्ज देत होती. पझेशन मिळाल्यापासुन एकटीच रहायची सवय. हो एकटीच...अकरावीपासुन हॉस्टेलमधे होते..ते रुम शेअर करणे..प्रत्येकाशी जुळवुन घेणे, तीच ती गॉसिप्स...वैताग आला होता नुसता. आता कसं स्वतंत्र, निवांत राहता येत होतं...हळुहळु फ़्लॅटवर गरजेच्या सगळ्या वस्तु जमल्या होत्या. वीकएंड्सला आठवड्याभराचे कपडे वॉशिंग मशिन मधे लावणे, ब्युटी पार्लरची एक चक्कर..मित्रमैत्रिणींना फ़ोन लावुन कुठल्यातरी मोठ्या रेस्टॉरंटमधे जावुन काहितरी नवीन ट्राय करणे.

आज मात्र काहीतरी विचित्रच वाटत होतं...काल ऑफ़िसमधे काम अर्ध्यावर सोडुन गेले होते. खरंतर माझं काम नव्हतंच ते. सिस्टम ऑपरेशनल झाली होऊन आठवडा उलटला होता, पण रोज क्लायंटच्या तक्रारी येत, कि हे चालत नाही, ते चालत नाही. कालही संध्याकाळी सात वाजता पी.सी. बंद करतांनाच आऊटलुक मधे ऑनसाईट वरुन एक मेल आला. काहितरी मेजर फ़ाटलं होतं आणि तिथे कोणालाही काय होतंय ते समजत नव्हतं. माझी मदत हवी होती. मेलवर नजर टाकतच होते की प्रकाश माझ्यामागे येऊन उभा ठाकला.

प्रकाश, आमचा प्रोजेक्ट मॅनेजर, त्याला आधीच फ़ोन आला होता आणि त्याने तात्काळ माझ्या क्युबिकलकडे धाव घेतली.

"प्रिया, तुझी मदत हवीय..सिस्टम खुप स्लो झाली आहे. क्लायंट ऑफ़िसमधे आताच सगळे काम सुरु होइल. तीन चार जण ऑलरेडी आले आहेत...इतकी स्लो सिस्टम पाहुन त्यांनीच आरडाओरड सुरु केलीय. आज दिवसभर असं चाललं तर मोठं एस्कलेशन होईल. ह्या महिन्यातले हे पाचवे एस्कलेशन असेल...आपल्याकडुन हे अकाऊट जाईल. "

"प्रकाश...अरे इतका पॅनिक नको होऊस रे..मी बघितलाय काय इश्श्यु आहे ते...अरे एन्व्हायर्नमेंटचा प्रॉब्लम आहे..ह्यांना ऑनसाईटला बसुन इतकंही नाही करता येत तर परत या म्हणावं. मी त्याला रिप्लाय करतेय..सेटींग्स चेंज केल्या तर सगळं व्यवस्थित होईल."

"थॅंक्स प्रिया..मी आता ऑनसाईटला फ़ोन करुन विचारतो..तु पटकन रिप्लाय कर..आपण त्यांच्याशी बोलु...बघुया तु म्हणतेस तोच इश्श्यु आहे का."

"लवकर कर...प्रकाश...आज मला साडे सातची बस पकडायची आहे...आज योगेश चा बर्थडे आहे...आमचे प्लान्स आधीच ठरलेले आहेत. प्लिज...आणि मी मेल पाठवलाय ऑनसाईटला"

"अगं हो...तु म्हणतेस ना की फ़ुटकळ इश्श्यु आहे.....लागला बघ कॉल.. मी स्पीकरवर लावतो."

"हॅलो...सतिश...क्या चल रहा है यार?...प्रिया का मेल देखा क्या? उसने सोल्युशन भेजा है..ट्राय करके देख ना...अभी ट्राय कर..We are planning to leave now for home".

"Man...I'm not able to access the settings...account locked...let me get it unlocked..give me some time....rather i'll call you guys back".

"Ok..Satish..but plz hurry up..चलो में रखता हूं..bye".


"काय हे प्रकाश...मी एकही मिनिट एक्स्ट्रा थांबणार नाही..साडेसातची बस पकडायचीय मला..त्याला सांग माझ्या सेलवर कॉल करायला"

"प्रिया...तु बसमधे असल्यावर तुझी नेहेमीच रेंज जाते...मग तु पब मधे जाणार आहेस...तिथे तर अशक्यच आहे तुला कॉल करणं...तु प्लिज थोडा वेळ थांब ना"

"अरे पण मी ऑलरेडी सोल्युशन सांगितलं आहे...त्याला जर इतकंही करता येत नसेल तर काय उपयोग आहे त्याचा? मी किती दिवस असं इथे ऑफ़शोअरला बसुन ह्यांची कामं करायची?...मी जाणारच..तेही साडेसातला."

"पण ऑनसाईटला सपोर्ट करणं हेही तुझं कामच आहे. आणि परिस्थिती बघ...आज जर काही झालं तर आपलं कॉंट्रॅक्ट कॅन्सल होईल.. ह्या अकाऊंटचे इतर प्रोजेक्टही हे लोकं काढुन घेतील."

"हो...मग देतेय ना सपोर्ट..त्याने काय स्वत: सोल्युशन शोधुन काढलेलं नाही. मीच पाठवलंय ना? ह्यापेक्षा जास्त मी काही करु शकत नाही. बाकी गेल्या पाच वर्षात मॅनेजमेंटने असं काय माझ्यासाठी केलं? सिनिअर असुनही ऑफ़शोअरला बसुन आहे. आज तुमचे अकाऊंट बंद व्हायला आले तर मी आठवते? मी जाणार म्हणजे जाणार.."

"काय हा ऍटिट्युड प्रिया...प्लिज..मी तुला सोडतो हवं तर."

"no way Prakash...!! आणि तुला इतकं पॅनिक व्हायची गरजच नाहिये...सगळं ठीक होईल...सतीश इतकाही मंद नाहीये...चल मी निघते...bye."


"I don't think this is right Priya..you are making it an ego issue...anyways...there is no point arguing with you..but if anythings fails...I won't spare you..remember that."

"Ok. We will see...Now i think it was my mistake to provide the solution..I should have ignored Satish's mail. bye."

"Ridiculous...!!" प्रकाश अस्पष्टसा पुटपुटत निघुन गेला.

मीही गाशा गुंडाळला आणि घरी आले. आठ वाजता योगेश आला आणि त्याच्या बाईकवर आम्ही पब मधे गेलो. आमचे मित्रमंडळ आधीच तयार होतं...ती रात्र धुंदीतच गेली. दोन टकिलाचे शॉट्स मीही मारले...आजुबाजुला काय होतंय काही कळतंच नव्हतं..अगदी हलकं हलकं वाटत होतं..रात्री मला योगेशनेच घरी आणुन सोडलं असावं..कधी घरी आले..कधी झोपले काही कळालंच नाही. बिचारा योगेश...माझा बेस्ट फ़्रेंड..माझ्यासाठी किती करतो...आमच्या ग्रुपचा काही प्रोग्राम ठरला कि मला घरुन पिक करायची आणि ड्रॉप करायची जबाबदारी त्याचीच असते.काही आजारपण असो कि काही मदतीची गरज असो..योगेश धावुन येतो..योगेशचा विचार करता करताच मी उठले आणि त्याच्या विचाराने नकळत माझ्या चेहऱ्यावर उमटलेलं स्माईल मला समोरच्या आरशात दिसलं.

योगेश आणि मी एकाच कॉलेजात होतो....धुळ्याला. तो तसा मुळचा पुण्याचाच. पण बारावीतले कमी मार्क्स त्याला आमच्या कॉलेजात घेऊन आले. पेमेंट सीट मधे ऍडमिशन घेऊन आलेला योगेश तसा व्यवहारात स्मार्ट होता. त्याचे बोलणे, वागणे जास्तच लाघवी होते. पण मार्कांची गाडी कधी पंचावन्न टक्क्यांच्या पुढे जात नव्हती. कॉलेजच्या काहींना तो रईस बापकी बिगडी हुई औलाद वाटायचा...का ते माहित नाही..कदाचित तो जास्तच फ़न-लव्हिंग होता..प्रत्येक गोष्ट सेलिब्रेट करणे ही त्याची पद्धत होती. अभ्यासापेक्षाही मित्र, मैत्रिणी महत्वाचे. त्यांच्यासाठी काहीही करायला तयार. त्यामानाने मी मात्र स्कॉलरशिपवर शिकणारी. मला अभ्यास खुप महत्वाचा...मी शिकुन मोठी कॉम्युटर (कॅम्पुटर म्हणत ते) इंजिनिअर व्हावं असं बाबांना फ़ार वाटे. गावच्या प्राथमिक शाळेत शिपायाचं काम करत बाबा. कधी कधी शाळेच्या कामानिमित्त जिल्हाच्या ठिकाणी जात असत आणि तिथेच त्यांना जगात काय सुरु आहे हे कळत असे. असाच एकदा ते धुळ्यात कुठेतरी ’कॅम्पुटर’ बघुन आले..मग पुढे दरवेळी तो काय प्रकार आहे याची माहिती काढत असत..नंतर त्यांना थोडी माहिती कळल्यावर त्यांनी मला कॅम्पुटर इंजिनिअर बनवायचे ठरवुनच टाकले.

इंजिनिअर बनणे तसे कधी अवघड गेलेच नाही मला...सहजच मार्क्स मिळाले..आमच्या वेळी पीसीएम चे मार्क्स बघत. टॉपर नव्हते मी, पण प्रायव्हेट कॉलेजच्या फ़्रिसीट वर ऍडमिशन मिळण्याइतपत मिळाले. बाबांना कोण आनंद झाला...मला मात्र काही विशेष वाटत नव्हतं..पण बाबांनी अकरावी-बारावीसाठी मला धुळे शहरात हॉस्टेलमधे राहु दिले, सगळा खर्च केला. त्यांची सगळी मेहनत फ़ळाला आली. आमच्या गावातली मी पहिलीच मुलगी होते इंजिनिअरींगला ऍडमिशन मिळालेली. काही लोकांनी नाकं मुरडली..लग्नाच्या वयात कुठे शिकायला पाठवतात म्हणुन बाबांना सल्ला दिला गेला..बाबांनी मात्र काही ऐकलं नाही. मलाही अकरावी-बारावीत धुळ्याला राहुन थोडं जग पाहता आलं होतं. माझ्याबरोबरचे अनेक मित्र-मैत्रिणी इंजिनिअरींगला जात होते, त्यांच्यापेक्षा जास्त मार्क्स असल्याने मला अर्थातच इंजिनिअरींगला जायची इच्छा होती....अशाच होत्या माझ्या इच्छा..जो ट्रेंड सुरु आहे त्यालाच follow करणे एव्हढेच मला शहरात येऊन कळाले होते. अकरावी-बारावीत मुलांशी बोलायची सवय झाली होती. धुळ्यात मुलं जास्त बोल्ड नव्हतीच...पण कोणी आजुबाजुला नाही हे पाहुन friendship देती का वगैरे विचारणा झाल्या होत्या. काही मुलं होस्टेलपर्यंत पाठलाग करत...हॉस्टेलवर फ़ोन कॉल करत. सुरुवातीला मी अगदीच भांबावुन गेली...पण मग सवय झाली...ह्यांना कसं हॅंडल करायचं कळु लागलं.

इंजिनिअरींगला मात्र वातावरण बदललं...कॉलेजमधे बरीच सुट मिळे..तिथे आमचा ग्रुप जमला. योगेश आमच्या ग्रुपचा आत्मा होता...आणि मी ब्रेन...आमच्या ग्रुप मधे तीन मुली होत्या आणि चार मुलं. योगेश आणि अनुजा यांचे सुत याच काळात जुळले. पण अनुच्या पप्पांनी एकदा त्यांना एकत्र पाहिलं आणि मग काय झालं माहीत नाही. पण अनु आमच्या ग्रुपपासुन दुरच गेली. योगेश तसाच नेहेमीसारखा वागायचा प्रयत्न करायचा काही झाले नाही असंच दाखवायचा. फ़ायनल सेमिस्टर ला मात्र अनुच्या engagement ची बातमी आली आणि रडला तो ढसाढसा..सगळ्यांसमोर. घरी जायला निघाला, पण मीच समजुत काढली शेवटचे दोनच महिने उरले होते.कसाबसा तो थांबला...अभ्यासात त्याने मन गुंतवुन घेतले. खुप अभ्यास केला..आणि फ़ायनल सेमिस्टर मधे मात्र सगळे कव्हर केले. त्यालाही फ़र्स्ट क्लास मिळाला. मीही माझा फ़र्स्ट क्लास धरुनच होते.

तो पुण्याला परत गेला, आणि मी धुळ्याच्याच एका प्रायव्हेट कॉलेज मधे लेक्चरर म्हणुन जॉईन केले. पण तिथे मन रमेना. पण आता मी स्वत:च्या पायावर उभी होती. बाबांना त्याचा अभिमान होताच, पण लग्नाची चिंता एव्हाना त्यांना सतवायला लागली. आमच्या समाजात फ़ार शिकलेले मुलं नव्हतीच. त्यामुळे मोठाच प्रॉब्लम झाला. मी प्रत्येक स्थळाला नकार देत होते. इतकी मेहनत करुन आपण शिकलो, नोकरी करतोय..सात-आठ हजार महिना पगार आहे हे सगळं सोडुन एखाद्या नाशिकला डिप्लोमा करुन नोकरीला लागलेल्या मुलाबरोबर लग्न करायची कल्पनाच सहन होत नव्हती.

योगेशचा कधीमधी फ़ोन येई. तो पुण्याला रेव्होसॉफ़्ट ह्या नामवंत सॉफ़्टवेअर कंपनीत जॉईन झाला होता. पगार होता अठरा हजार. कौतुकच वाटे त्याचे. एकदा त्याने फ़ोन केला, म्हणाला आमच्याकडे ओपनिंग्ज आहेत, तुझा रेझ्युमे पाठव. मी पाठवला. आणि रेव्होसॉफ़्टमधे आली. कंपनीतलं खेळकर वातावरण आणि पुण्यातीलच एकुण वातावरण माझ्यासाठी नवंच होतं. कितीही सिनिअर असेल तरी ’फ़र्स्ट नेम’ ने बोलवायचं..अहो-जाहो नाही. कंपनीत इंग्लिशचा इतका वापर..प्रोजेक्ट पार्टीज...इंटरनेट (त्यावेळी होतं इंटरनेट...आणि तेही बंधनमुक्त)..पंधरा हजार पगार माझ्यासाठी खुपच जास्त होता..कामही मरमर करावच लागायचं म्हणा. पण लवकर घरी जाऊनही काय काम असायचं? कोणी ओळखी पाळखीचे नाही...नवं शहर. हळु हळु ओळखी झाल्यात...ऑफ़िसमधे आमचा चांगलाच ग्रुप जमला. हळु हळु मी पक्की झाली. शहरातल्या वातावरणाशी ऍडजस्ट झाली. मग तर मी वीक-एंड्चीच वाट बघत असे. खरंतर शुक्रवारी साडेचारपासुनच आमचं ऑफ़िस रिकामं व्हायला लागे. मग राहुल मधे आम्ही सिनेमा बघायला जायचो..फ़र्स्ट डे फ़र्स्ट शो.

सहा महिन्यात कधी एकदा गावी जाणे होई. गावी गेली कि आई-बाबा चिंतेत दिसायचे..मुलीसाठी योग्य स्थळ मिळ्त नाही..जे थोडंफ़ार ठीकठाक असतं ते मुलगी नाकारते..मला तर वाटायला लागलं की त्यांना मला एव्हढं शिकवल्याचा आता पश्चाताप होतोय. काही नातेवाईकांनी तर आईबाबांना इतके सुनावले होते की बस...घरी कोंडुन ठेवा..पुण्याला जाऊच देऊ नका असा सल्लाही दिला होता. एकदा रागाने बाबांनी तशी धमकीही दिली मला. खुप रडले मी त्यादिवशी. बाबांनी धमकी प्रत्यक्षात आणली नाही. मी निघाले पुण्याला...मनाशी पक्का निश्चय केला की पुन्हा गावी येणार नाही.

मग बाबांचा अनेकदा फ़ोन आला, एकदा तर ते फ़ोनवर रडले..आम्ही काय चुक केली आणि तुला एव्हढं शिकवुन मोठं केलं असं म्हणाले. मलातर कसं रिऍक्ट करायचं हेच कळेना. माझ्या व्यथा कोणी समजावुन घेईल असं आजुबाजुला नव्हतंच. पुण्यातला आमच्या ग्रुपमधे तर कुणाला हा काय प्रकार आहे हे कळलंच नसतं. मी मग कोशात जाऊ लागली. बाबांचे फ़ोन जसजसे वाढु लागलेत तसतशी मी अधिकच एकटी एकटी राहु लागली...खोटं हसणंही आता मला जमेना.

कंपनीतही सगळं आलबेलं नव्हतं...मॅनेजरची चमचेगिरी करुन अनेक जण ऑनसाईटला गेली होती....मी विचारणा केली तर कळलं की ऑफ़शोअरला कोणीतरी स्ट्रॉंग टीम प्लेयर हवा म्हणुन मला इथेच ठेवण्यात आलंय...दिवसंदिवस ह्या मुर्खांचे ऑर्कुट अकांटवरील फ़ोटो अपडेट बघुन चीड यायची..हे तिथे मजा मारताहेत आणि आम्ही इथे नुसते सडतोय. हळुहळु ऑफ़िसमधे माझी वरचे वर भांडणं होऊ लागलीत. कालचा प्रकारही त्यातलाच. मी असं का वागतेय ह्याचा उलगडा कोणालाच होत नव्हता...एक प्रकारचे फ़्रस्ट्रेशन त्यात साचले होते...म्हणुनच रात्री पबला जावुन बेभान नाचायची एकही संधी मी सोडत नव्हते.

योगेश मात्र कॉलेजच्या प्रेमभंगाच्या धक्क्यातुन सावरलेला दिसत होता...पुण्याला आल्यावर त्याने कधी एकदाही अनुची आठवण काढली नव्हती किंवा तसा विषय निघालाच तरी तो त्याला टाळत नसे...काही कडवटपणा नव्हता की हळवेपणा..

रात्री त्यानेच घरी सोडले असावे...एकदा त्याला फ़ोन करावा म्हणुन मोबाईल शोधु लागले...कुठे होता हा मोबाईल?... पर्समधे...पर्समधुन काढला..एक नवा एसएमएस आला होता...ओपन केला...योगेशचाच एसएमएस होता..रात्री साडेबारा वाजताचा...काय असं आठवलं त्याला इतक्या रात्री? उत्सुकतेने वाचला..
"प्रिया...तुला खरंतर प्रत्यक्ष बोलुनच सांगायचं होतं...पण तु शुद्धीत होतीसच कुठे? तुला घरी सोडलं आणि बाहेरुनच हा एसएमएस लिहितोय. आज माझा वाढदिवस आहे...नेहेमीप्रमाणे तु काही गिफ़्ट घेतलीच नाहीस..आज मागावी म्हणतोय. मी कॉलेज सोडणार होतो...तुच माझी समजुत घातलीस. मला ताळ्यावर आणलंस..तुही हल्ली अशीच ताळतंत्र सोडुन वागतेयस...प्लिज..भानावर ये..आणि मला सांग...फ़ोन कर...बोल माझ्याशी..मन मोकळं कर तुझं...मित्र असतातच कशासाठी?...मित्र म्हणुन हेच एक मागणं आहे...मला माझी जुनी समजुतदार मैत्रीण परत कर"

योगेशला कळालं होतं...मला भरुन आलं...जगात एकतरी माणुस आहे ज्याच्यासमोर मी माझे मन मोकळं करु शकते...मित्र म्हणजे काय याची खरी जाणीव आत्ता झाली. तेव्हढ्यात फ़ोन आला...प्रकाशचा होता..मी उचलला..
"हॅल्लो"
"प्रिया, मी प्रकाश"
"ह्म्म्म.. बोल."
"एक बॅड न्युज आहे प्रिया"
"काय?"
"काल तुला सोडुन घरी जात असतांना योगेशच्या बाईकला ट्रक ने धडक दिली"
"What..???"
"he is no more..Priya.."

एका सेकंदात सगळे जग थांबले. मी फ़ोन ठेऊन दिला...काय होतंय कशाचंही भान उरलं नाही...योगेश गेला? कालच तर तो...किती आनंदात होता....आणि त्याचा हा SMS...

तेव्हढ्यात पुन्हा फ़ोन वाजला...बाबांचा होता तो...नकळतच उचलला..

"हॅल्लो.. बेटा...कशी आहेस?"
"बाबा......मी येतेय तिथे...तुम्ही म्हणाल त्याच्याशी लग्नाला तयार आहे"
"खरंच पोरी..?"
"हो बाबा...मी येतेय...कायमची".

No comments:

Post a Comment