Sunday, September 26, 2010

बूमऱँॻ

साथ देणे म्हणजे नक्की काय असते ? कितीतरी वेगवेगळे अर्थ आहेत या शब्दामध्ये .. म्हणजे साथ हवी कुणाची तरी याची जाणीव होत नाही तोपर्यंत साथ देणे पण समजत नाही असे वाटते मला... पण साथ देणे याचा अर्थ कळायला बरेच दिवस जातात असे म्हणायला काही हरकत नाही .. म्हणजे आपण सगळे इतके सहज घेतो ना .. लहान असताना आई बाबांची साथ मिळत असते नेहमी.. नंतर मित्र - मैत्रिणी येतात.. ते सगळे असताना कधी जाणीव नसते झालेली कि हे सगळी लोक अशीच नाही आहेत आपल्या आयुष्यात तर ते आपल्याला साथ देत आहेत.. आणि मग आपण पण नकळत त्यांना साथ देत असतो.. पण या शब्दांची जाणीव नक्की होते कधी..ज्यावेळी तुम्ही खूप एकटे पडून जाता.. किंवा सगळे सोडून कुठेतरी दूर जाता.. मग लक्षात यायला लागते कि आपल्या बरोबर असणारी माणसे अशीच न्हवती आपल्या आयुष्यात .. त्यांच्या असण्याला काहीतरी नाव होते.. , मनात जागा होती.. , यांचे अस्तित्व कुठेतरी आपल्या आयुष्याशी जोडले गेले होते.. जे अचानक विस्कळीत झाले आहे.. असे काहीतरी.. म्हणजे आई बाबांबरोबर जवळ आपण आपले अर्धे आयुष्य जगतो.. पण त्या अर्ध्या आयुष्याचे महत्व कळायला अर्धा मिनिट पण लागत नाही एकदा तुम्ही लांब गेलात कि.. मित्र - मैत्रिणींचे पण काही वेगळे नाही आहे.. नुसते काही नेहमीचे शब्द जरी वापरत आली तरी असे वाटायला लागते कि किती गोष्टी आपण मागे टाकून आलो आहोत.. कितीतरी असेच राहून गेले आहे... काही काही गोष्टी अर्धवट आहेत.. तर काही पूर्ण कराव्या लागल्या आहेत.. माहित नाही .. असे अर्धवट सोडून दुसरे काहीतरी सुरु करणे किती चूक बरोबर पण गेलेल्या आयुष्याची किंमत ते गेल्यावरच कळते.. हे किती दुर्दैव असावे ना .. !
काही काही गोष्टी कळायला त्या आधी सोडाव्या लागतात असे म्हटले तर .. खरच इतकी मोठी किंमत मोजायची गरज असते .. ?? सगळे कसे मग बूमऱँॻ वाटायला लागते ना ? प्रत्येक वेळी आपण केलेल्या गोष्टीचा आपण हिशोब बरोबर करत असतो.. सगळ्याची किंमंत आहे ...आपल्या कडे असणाऱ्या गोष्टींची किंमत कळायला पण किंमत मोजावी लागते.. यापेक्षा अजून काय वाईट असू शकते.. पण कधी कधी मला असे पण वाटते कि त्यावेळी माहित असते कि एखादा माणूस आपल्या फक्त साथच देत नाही आहे तर स्वतःची सुख दुःख वाटत आहे ..आपल्याबरोबर तर खरच काही फरक पडला असता .. अन जर तो पडला असता तर त्याने चांगली गोष्ट साध्य झाली असती कि वाईट .. खरच जर- तर च्या गोष्टी नेहमीच व्यसन वाटत आल्या आहेत मला.. आपण आपल्याच मनाला समजून घालायचे एक रामबाण औषध वैगरे वाटते मला ते..कारण कुठल्याही वाक्यात जर-तर घातले कि हवे ते निष्कर्ष काढतात येतात.. आणि मनाची समजून हि घालता येते.. पण खरच विचार केला तर ते सगळे नुसते मृगजळ सारखे तर असते.. !
साथ देणे आणि साथ निभावणे पण कितीतरी वेगळ्या गोष्टी आहेत.. पण दोन्ही चे महत्व कळायला खूप वेगवेगळे अनुभव यावे लागतात .. प्रत्येक गोष्टीला असणाऱ्या दोन बाजू नेहमीच ट्रिकी असतात... कुठली बाजू आपल्याला पहिली अनुभवायला येईल तसे सांगणे अवघड पण.. माझ्या मते साथ हवी याची जाणीव आधी होत असावी... मग ती मिळावी म्हणून माणूस साथ निभावायला लागतो... जे इतके सोपे नक्कीच नाही आहे पण जर साथ मिळवायची इच्छा असेल तर त्याच्या दिशेने सोडलेले बूमऱँॻ तर असते.. ! परत येणाऱ्या निष्कर्ष ची वाट बघणे... एवढेच ते काय आपल्या हातात... !!!!

Tuesday, September 21, 2010

माणूस

माणसाची माणसे असतात कि माणसांचा माणूस असतो .. ??? कधी कधी विचार करायला गेलो तर आपण किती एकटे असतो या जगात.. कधी विचाराने, कधी माणसांमध्ये, कधी माणसामुळे, कधी घटनांमुळे अशी बरीच कारणे असतात ... त्या एकटेपणा मागे.. पण प्रत्येक वेळी आपण त्यातून परत यायचा प्रयत्न करत असतो .. आपल्याला एकटे राहायचे नसते.. किंवा एकटे राहणे वाईट गोष्ट आहे हे कोणी ठरवले असेल .. ??? आपण आपल्याला शोधणे इतके का वाईट असते का ?? कितीतरी प्रश्न पडतात.. खरच एकटे असताना माणसाला त्याच्याच विषयी किती नवीन गोष्टी सापडतात .. कितीतरी गोष्टी आपण कुठेतरी लपवून ठेवलेल्या असतात . कितीतरी माहित नसतात .. माणसात राहणारा आणि माणसांविषयी विचार करून एकटा राहणारा पण किती वेगळी व्यक्तिमत्वे आहेत ना ? माणसांमध्ये राहणारा माणूस माणसांचा होतो आणि एकटा राहणार्‍या माणसाची माणसे असतात असे म्हणता येईल का ? मोठी मोठी लोक माणसांचा माणूस असतात असे म्हटले तर गल्लीतला एकटा राहणारा म्हातारा सुध्दा गल्लीचा असतोच कि .. अगदी सगळ्यांचा .. कशावरून ठरते तुम्ही माणसांचे आहात का माणसे तुमची आहेत.. का प्रत्येक माणसामध्ये दोन्ही बाजू असतात .. कुठेतरी ... फक्त कधी कुठली डोक बाहेर काढते तर कधी कुठली . ? आपण समाजात राहताना इतका माणसांचा विचार करतो .. पण दुसरे ज्यावेळी सेम विचार करत असतात त्यावेळी आपण त्याच्यासाठी समाजातला भाग झालेलो असतो .. म्हणजे आपण दोन्ही भागात असतो .. माणूस बदलला कि .. विचार बदलला.. !
नेहमी आपल्याला चांगली बाजू दाखवून लोकांच्या नजरेत मोठे व्हायचे असते.. त्याची ओढ कुठेतरी "माणसांचा माणूस" होण्याचा प्रयत्न तर नसावा .. त्याला प्रत्येकाची अनुमती हवी असते .. किंवा त्याची असणारी माणसे काय विचार करतात हे त्याला कुठेतरी खूप जास्त महत्वाचे असते .. म्हणजे "माणसाची माणसे" खूप आधी येतात आयुष्यात .. पण माणसांचा माणूस होणे म्हणजे बर्‍याच गोष्टी आल्‍या. अन सगळ्यात महत्वाचे म्हणजे मोठे होणे आले . चुका करायचा अधिकार नाही कारण लक्ष नेत्रांचा पहारा आहे .. असे काहीतरी होऊन जाईल का ? समाज आपल्याला घडवतो तसेच आपण समाज घडवत असतो ... त्याचा भाग बनून .. त्यामुळे आपण नेहमीच दोन्ही बाजूला असणार आहे .. या सगळ्या गोष्टी कधीच जाणवल्या नसतात .. लहान असताना अचानक आपण मोठे होतो.. सगळ्यांचा नजरा निरखून आपल्याकडे बघत असतात .. पहिले थोडे घाबरत, नंतर थोडे सावरत आपण कसे या समाजाचे दोन्ही बाजू बनून जातो कळत पण नाही .. अश्यावेळी दुःख करावे कि आनंद साजरा करावा हाच मोठा प्रश्न होऊन बसतो ... हे मात्र खर .. !