Saturday, December 10, 2011

राजकारण: एक आठवण

राजकारण म्हणजे नक्की काय असतं? हा प्रश्न अनेकदा पडायचा. नेत्यांची विधानं/भाषणं..मोर्चे/यात्रा..आंदोलनं असंच लहानपणी वाटे.

मी वृत्तपत्रांमधे राजकारणावर वाचायला सुरुवात केली असेल १९८९ सालापासुन. फ़ारसं काही कळायंच नाही. बोफ़ोर्स वरुन राजीव गांधी कसा काय चोर आहे इतकंच समजायचं. तेव्हा उल्हासनगरला रहायचो. ठाणे मतदारसंघात रामभाऊ कापसेंनी तत्कालीन कॉंग्रेसचे खासदार शांताराम घोलप ह्यांचा पराभव करुन खासदार झाले. कॉंग्रेसविरोधी लाट होती. निवडणुकीच्या स्लोगन्स वगैरे ऐकायची तेव्हा सवय झाली. त्याकाळी निवडणुक प्रचारावर भरमसाठ खर्च व्हायचा (पुढे टी.एन.शेषन निवडणुक आयुक्त झाल्यावर कमी झाला). प्रत्येक भींत रंगवली जायची. स्लोगन्स देत रिक्षा/टेम्पो दिवसरात्र फ़िरत. प्रत्य्के पक्षाचं चिन्ह माहित करुन घ्यायची उत्सुकताही असे.

विधानसभा, लोकसभा, नगरपालिका ह्या सगळ्या निवडणुका एखाद्या क्रिकेट मॅच सारख्या वाटत. निवडणुकांचा हंगामच होता तो.

व्हि.पी.सिंग पंतप्रधान झाले, देवीलाल उपपंतप्रधान. मग आरक्षणाबद्दल ऐकु लागलो. कि आरक्षणामुळे कशी काय देशाची वाट लागणार आहे. लायकी नसलेले लोकं कसे काय पुढे येतील असंच काही. मंडल कमीशनबद्दल लोकं बोलत. कोणी आत्मदहन केलं असं वाचायला मिळे. मी तेव्हा नुकताच अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयात प्रवेश घेतला होता. आमचे शिक्षक त्याकाळचे बहुतेक रा. स्व संघातले होते. शिकवायचे उत्कृष्ट, पण मधुन मधुन आरक्षण, राममंदीर वगैरेंवर बोलायचे. त्यातुनच समज झाला होता की आरक्षण वाईट आणि राममंदीर व्हायलाच पाहिजे वगैरे.

पुढे व्हि.पी.सिंग ह्यांचा पाठींबा भाजपाने काढला. सरकार गडगडले. जनता दलात फ़ुट पडली. चंद्रशेखर ह्यांना राजीव गांधींनी पाठींबा देऊन पंतप्रधान बनवलं. ही बाब तर तेव्हा खुपच नवलाईची वाटली होती..की शेवटी राजीव गांधींचाच पाठींबा घेतला. पण पुढे हळु हळु राममंदीराचीच चर्चा सुरु झाली. तो प्रचार इतका मजबुत होता की आम्हीही "हम कसम राम की खाते है...मंदीर वही बनायेंगे" आणि अशा अनेक घोषणा पाठ करायला लागलो.


त्याच काळात १९९० साली विधानसभेच्या निवडणुकाही झाल्यात. बाळासाहेब, भुजबळ, मनोहर जोशी, सुधीर जोशी ह्यांची नावं ऐकीवात येत. शिवसेना आधीपासुनच माहीत होती त्यांच्या वाघ ह्या चिन्हामुळे. विधानसभेला धनुष्यबाणाचं चिन्ह पाहुन आश्चर्य वाटलं होतं.

अंबरनाथच्या शाळेत जातांना तिथल्या मतदारसंघातले उमेदवारही कळुन येत. शिवसेनेचे साबिर भाई शेख तेव्हा निवडणुकीला उभे होते आणि कॉंग्रेसतर्फ़े कोणीतरी संजय दत्त म्हणुन उमेदवार तिथे होता. आधी तो आम्हाला सिनेस्टार संजय दत्त वाटे.

उल्हासनगरला पप्पु कलानी नगराध्यक्ष झाल्यावर उल्हासनगरचा कायापालट सुरु झाला होता. आणि कलानी लोकप्रियतेच्या शिखरावर होते. उल्हासनगरचं सिंगापुर करायचा त्यांचा इरादा आहे असं ऐकायचो तेव्हा. ९० साली ते आमदारकीला कॉंग्रेसतर्फ़े उभे राहिले तेव्हा त्यांची प्रचाराची फ़ेरी आजही आठवते. एका वेगळ्याच प्रकारच्या बससदृश मोठ्या गाडीच्या टपावर बसुन त्यांची वरात निघे.

अंबरनाथला सेना जिंकली तर उल्हासनगरला पप्पु कलानी. राज्यात थोडक्यात पवारांचे सरकार आले. तेव्हा पवारांच्या कौशल्याबद्दलही बरचं ऐकायला यायचं नक्की काय कौशल्य ते कळायचं नाही. कलानींबरोबरचे त्यांचे संबंधही ऐकायला मिळायचे. विरोधी पक्षनेता म्हणुन मनोहर जोशींची निवड झाली त्याबद्दलही चर्चा चालत की सुधीर जोशी हे जास्त योग्य होते आणि भुजबळांचा तर हक्कच होता.

त्याच काळी आम्ही अंबरनाथला रहायला आलो. आमच्या शाळा अंबरनाथला असल्याने आणि अंबरनाथ हे स्टार्टींग स्टेशन असल्याने बाबांनी अंबरनाथला घर घेतले. अंबरनाथला आल्यावर शिवसेना शाखा म्हणजे काय हे बघायला मिळाले. एका किल्ल्याची प्रतिकृती असलेली शाखा आणि त्यातले दाढीवाले शिवसैनिक ह्यांच्याबद्दल प्रचंड आदर होता. माझ्या मित्राचे मामा (पोतनीस काका) शिवसेनेत होते आणि आमच्याच गल्लीत रहायचे. तेव्हा त्यांच्या कहाण्या ऐकायला मिळायच्या. ते कसे कारसेवक म्हणुन अयोध्येला जाणार आहेत वगैरे.

महाराष्ट्रात कॉंग्रेस आली तरी देशपातळीवर वेगळेच वारे होते. राममंदीर आंदोलन जोरात असतांना कॉंग्रेसने चंद्रशेखर ह्यांचा पाठींबा काढुन घेतला होता आणि पुन्हा निवडणुक होणार होती. प्रचार जोरदार सुरु होता. पण त्या प्रचारकाळातच राजीव गांधींचा खुन झाला आणि सगळं वातावरण बदललं. कॉंग्रेसला बऱ्यापैकी जागा मिळाल्या आणि पवार पंतप्रधान होणार अशा वावड्या उठायला लागल्या. महाराष्ट्रात जवळपास ३८ खासदार कॉंग्रेसचे होते. पण त्यांनी पवारांना पाठींबा दिला नाही असं कळलं. सुनील दत्त ह्यांनी तर स्पष्टपणे नकार दिला होता हे त्यांच्या मुलाखतीत कळलं.

त्याआधी एक मोठी घटना घडली...ती म्हणजे शिवसेनेला भुजबळांनी दिलेली सोडचिठ्ठी. भुजबळ लपुन राहिले होते आणि शिवसैनिक त्यांना शोधत होते. अनेक शिवसैनिकांना अटक झाली होती, अनेक शिवसैनिक भुमिगत होते. माझ्या मित्राचे मामाही. भुजबळ म्हणजे सगळ्यात मोठा गद्दार असं वातावरण शिवसैनिकांमधे होतं आणि त्यांना धडा शिकवायची इर्षाही दिसुन येई.

पवार दिल्लीत गेल्यावर सुधाकर नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. तेव्हाच राममंदिर आंदोलनातुन बाबरीपतन झाले. ते शिवसैनिकांनी पाडले असं ऐकुन अजुनच चांगले वाटायचे. त्याच काळात मुंबईत दंगली झाल्या. पण अंबरनाथ शांत होते. साबिरभाई हे मुस्लिम असल्याने असावं कदाचित. दंगली पाठोपाठ बॉंम्बस्फ़ोट झाले. पुढे संजय दत्तला अटक झाली. सुधाकर नाईकांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं आणि पवार महाराष्ट्रात परतले.

त्याच काळात पवारांवर आरोप सुरु झाले. मुंडे हे नाव मी तेव्हा पहिल्यांदा ऐकलं. खैरनार, मुंडे बेफ़ाम होते. एन्रॉन प्रकल्प तेव्हा महाराष्ट्रात येणार होता. सुधाकर नाईकही पवारांचे विरोधक बनले होते. कॉंग्रेस मधे निष्ठावंत नावाचा गट असतो तेही त्याकाळात कळलं. पवारांवर आरोप होत होते आणि त्यांची छबी एकदम भ्रष्ट, माफ़ियांचा सरताज अशी बनली. एकुणच पवारविरोधी वातावरण होतं. १९९५ साली झालेली निवडणुक पवार हरले. अवघ्या ८० जागा कॉंग्रेसला मिळाल्या. भुजबळांचा पराभव इर्षेला पेटलेल्या शिवसैनिकांनी करुन दाखवला. बाळा नांदगावकर ह्या अपरिचित चेहऱ्याला निवडुन आणला.

पुढे युतीच्या शासनात आमच्या आसपासचे बरेच शिवसैनिक सफ़ारी घालुन फ़िरायला लागले. बिल्डर बनले कोणी कंत्राटदार...त्याचबरोबर त्यांचा उत्साहही कमी होतांना दिसत होता. ह्याच काळात आम्ही मित्रमंडळीनी शाखेत जायला सुरुवात केली. शिवसेनेच्या...संघाच्या नाही. संघशाखांमधे संध्याकाळी क्रिकेटच्या टाईमाला पकडुन घेऊन जातात आणि कसलेतरी फ़ालतु खेळ खेळवतात म्हणुन आम्ही आधीपासुनच त्यापासुन लांब होतो. मी तेव्हा इंजिनिअरींगला होतो. फ़ारसा वेळ नसे. पण तरी वीकएंड्सला क्रिकेट खेळायचो. आमची टीम फ़ॉर्मात होती.

त्याकाळी अंबरनाथला लोकल गुन्हेगारीमुळे क्रिकेट टुर्नामेंट भरविणे बंद झाले होते. वादावादीतुन कोणी तलवारी बाहेर काढी. आणि मग सगळाच गोंधळ. पण टुर्नामेंट भरवण्यात फ़ायदा खुप होता. घरुन तेव्हा पैसे मिळत नसत. आम्ही ठरवले की टुर्नामेंट भरवायचीच.

पण टुर्नामेंटमधे जर कोणी गोंधळ घातला तर काय? म्हणुन आम्ही पोलिसांकडे प्रोटेक्शन मागायला गेलो. इतक्या शिव्या पोलिसांनी घातल्या असतील तेव्हा...शिव्या देऊन पळवुन लावले त्यांनी...तुम्ही काय इंटरनॅशनल टुर्नामेंट भरवताय काय...की सेक्युरिटी पाहिजे असं म्हणुन हाकललं पोलिसांनी. मग आम्ही शिवसेनेचा सहारा घेतला. सगळे जण रोज शिवसेना शाखेत हजेरी लावायचो. माझ्या मित्राच्या मामांना आम्ही कन्व्हिन्स केलं की टुर्नामेंट भरवणं कसं गरजेचं आहे. मग त्यांनी सगळ्यांना तयार केले, स्पॉन्सर्सचा बंदोबस्त केला आणि त्यातुन आम्ही नगराध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित केली. त्यातुन आम्हाला क्रिकेट्च्या २ बॅट आणि स्टंम्पस मिळाले. आम्ही खुष होतो. पुढेपुढे शाखेला जाणे कमी झाले. तिथे गेल्यावर कळले स्थानिक राजकारण काय असते ते.

स्थानिक राजकारणात तुम्ही कुठल्याही पक्षात जा. तिथे जर तुमची मोठी गँग असेल तर तुम्हाला वाव मिळणार. त्यामुळे तिथे प्रत्येकजण आपली जास्तीत जास्त पोरं घुसवायच्या नादात असतो. त्यातुनच पदांची वाटणी वगैरे होते. पुढे राष्ट्रवादी स्थापन झाल्यावर माझा एक मित्र मला तिथे घेऊन गेला. त्याला युवक अध्यक्ष करणार होते...तो मला म्हणाला की आपली २०-२५ मंडळी घेउन चल. तुला उपाध्यक्ष करतो. पहिल्या २ मिटींगनंतर मी तिथे फ़िरकलो नाही. अर्धी लोकं बेवडा मारुन आली होती. ही लोकं कोणाचं काम करतील असं वाटलं नाही.

त्यानंतर राजकारण सुटलंच. जे वाचायचं ते पेपर मधे. बाळासाहेब आणि पवार ह्या दोघांनाही पुढे फ़ारसं यश मिळालं नाही ह्याची खंत मात्र उगाच वाटत राहते.

Tuesday, December 6, 2011

माय डॅडी द स्ट्रॉंगेस्ट......


प्रत्येक लहान मुलाला आपल्या वडलांबाबत प्रचंड अभिमान असतो. घरात त्याला आपल्या वडलांचा अधार वाटतो पण काही अभागी मुलांना वडील असुन त्या वडलांबद्दल अभिमान वाटावा अस ऎकायला मिळत नाही. अनेक कारण असतात त्यासाठी. कधी कधी वडिल खरच कोणतच चांगल काम करत नाहीत. कधीकधी घरातल वातावरण तस असत. आई वडलांची भांडण असतात व त्यामुळे आई सतत वडलांबद्दल वाईटच बोलत असते.

नुकताच मला एक अनुभव आला.

माझ्याबरोबर पूर्वी काम करणारा एक माणूस मला रस्त्यात भेटला. अतिशय हुशार असा हा माणूस, माझ्या आधीच्या कंपनीत प्युन म्हणून लागला होता. बघता बघता संगणकाच रिपेअरिंग, थोडफ़ार सॉफ़्टवेअर हा थोड्या अवधीत शिकला होता. अत्यंत प्रामाणिक असलेल्या या माणसात सर्व गुण ठासुन भरलेले होते. फ़क्त एकच दुर्गुण या गृहस्थात होता ज्यामुळे त्याचे सर्व गुण फ़ुकट गेले होते तो म्हणजे हा दारुडा होता.

अनेकवेळा मी त्याला खुप झिंगुन लडबडत चालताना पाहिलेल आहे. आज तो शुद्धीवर दिसला, म्हणुन त्याची चौकशी करावी अस वाटल. मला त्यानी रस्त्यातच नमस्कार केला.

आपल्या ३-४ वर्षाच्या लहान मुलाला घेऊन तो चाललेला होता. बाप व मुलगा दोघेही अनवाणी व विटक्या कपड्यात होते. बापाचा चेहरा दारुमुळे सुजलेला होता. मुलाला बहुतेक २-४ दिवस आंघोळ घातलेली नसावी. कपडे फ़ाटके व मळलेले होते. केस कोरडे व रखरखीत दिसत होते. मी मुलाकडे बघितल, लक्षात येत होते ते त्याचे चकाकणारे काळॆभोर, पाणीदार व मोठे डोळॆ. ते डोळे भराभर आजुबाजुचा परिसर न्यहाळात होते व मिळेल ते शिकत होते. त्याच्या बापासारखाच हाही खुप हुशार असावा. चेहरा खुप तरतरीत व बोलका होता. मी माझ्या नकळत खाली वाकलो आणि त्याला उचलुन घेतल. आणि त्याचा बाप नको नको म्हणत असता जवळाच्या दुकानातुन एक बिस्किटाचा पुडा घेऊन त्या मुलाला दिला.

त्या मुलाला म्हणालो "तुझा बाप माझा खुप चांगला मित्र आहे, खुप हुशार व प्रामणिक आहे तो. त्याच्यासारखाच हो बर का ! " तो मुलगा इतका गोड हासला. आणि त्यानी अभिमानानी आपल्या बापाकडे पाहिल. काही न बोलता मित्र मुलाला माझ्या कडेवरुन घेऊन निघुन गेला. मला वाट्ल मी बोलताना काही चुक केली की काय.

काही दिवस मधे गेले आणि तो मित्र माझ्या घरी आला. आज त्याचा चेहरा कमी सुजलेला वाटला. मला म्हणाला "काका, त्या दिवशी तुम्ही मला रस्त्यात भेटलात व मुलाला म्हणालात की ’तुझा बाप खुप हुशार व प्रामाणिक आहे’ हे ऎकल्यावर मुलानी माझ्याकडे इतक्या अभिमानानी बघितल की मला ती नजर सहनच झाली नाही. घरी जाऊन त्यानी सर्वांना सांगितल की आजोबा म्हणत होते की बाबा खुप हुषार आहे. त्यानी पहिल्यांदाच आपल्या दारुड्या बापाबद्दल चांगल ऎकलेल असेल. त्याला मी कधी बिस्किट घेऊन दिलेल नव्हत. त्याला आयुष्यात पहिल्यांदाच संपूर्ण बिस्किटाचा पुडा मिळाला. पण काका त्यानंतर दारु पिताना मला तीच नजर दिसते. पोटात ढवळुन येत आणि मी दारु न पीता सरळ घरी जातो. काल त्याला बिस्किटाचा पुडा घेऊन गेलो. त्यानी विचारल की ’आजोबांनी दिला का ?’ मी म्हणालो "नाही रे मीच तुझ्यासाठी आणला आहे, माझ्या बाळासाठी" मित्र म्हणाला "काका, मी हे बोलल्यावर त्यानी खुप आनंदानी माझ्या गळ्यात मिठी मारली. बस मी ठरवल आहे. आता दारु नाही प्यायची."

या माझ्या मित्राचा हा निश्चय किती दिवस टिकेल कल्पना नाही. पण त्या लहान मुलाला "माय डॅडी द स्ट्रॉंगेस्ट" अस नक्कीच वाटल असेल.

आपण किती नशिबवान असतो आपल्याला जगातले सर्वात चांगले आई-बाबा मिळालेले असतात. फ़क्त ते किती चांगले होते हे ते गेल्यानंतरच आपल्याला समजत. मला माझ्या वडलांच्या आठवणी एकामागोमाग एक येत गेल्या.

मला माझ बालपण आठवायला लागल. माझ्या त्यावेळच्या जगात असलेल्या प्रत्येक संकटांमधुन मला बाहेर काढायची शक्ति असलेली एकमेव व्यक्ती म्हणजे माझे वडिल. मी त्यांना आण्णा म्हणायचो. त्यांच्या रुंद छातीचा मला खुप अभिमान होता. या छातीवर त्यांनी आभाळ पेललेल होत.

कधी ताप आला, काही लागल व नुसता त्यांच्या हाताचा स्पर्ष झाला तरी दुखण कमी व्हायच. ती एक त्यांच्या प्रेमाची जादू होती.

लहान असताना मला आजी शबरीची गोष्ट सांगत होत्या. खुप रंगवुन रंगवुन त्यांनी ती कथा सांगितली. शबरीनी बोरं कशी आणली व प्रत्येक बोर चाखुन कस पाहिल. आणि रामानी तीची भक्ति पाहुन ती बोरं कशी खाल्ली

आजी सांगत होती

"शबरीनी रामासाठी रानातुन बोरं आणली व ती गोड आहेत का हे बघायसाठी प्रत्येक बोर ती चाखत होती"
"पण आजी तीनी बोरं का आणली ? आंबा किंवा सफ़रचंद का नाही आणला ? देव तीच्या घरी येणार तर चांगल करायच न. आपण नाही का पूजा असली की किती चांगल करतो"

"अरे शबरी गरिब होती"

"गरिब म्हणजे काय ? "

"ज्यांच्याकडे कमी पैसे असतात त्यांना गरिब म्हणतात. ते लोक बाजारातुन फ़ळ आणू नाही शकत "

" आपण गरिब आहोत का ? "

" आपणही गरिबच. पण ती खुप गरिब होती "

" पण आजी आपण नाही का आंबे, द्राक्ष व सफ़रचंद आणतो. ते गोडच असतात. आणि रामानी ती उष्टी बोर कशासाठी खायची ? मला नाही ते आवडल. किती घाण होता तो."

माझ्या त्यावेळच्या जगात गरिबी व श्रिमंती या शब्दांना स्थानच नव्हत. आपण खुप आंबे, सफ़रचंद व द्राक्ष खातो. शबरी थो्डी कमी गरिब असेल पण तरी थोडी फ़ार अशी फ़ळ आणत असेलच न. मला काही केल्या आजीनी सांगितलेली गोष्ट पटतच नव्हती. आजीच लॉजीकच समजत नव्हत. उगाच आजीशी हुज्जत घालत होतो.

आण्णा ऎकत होते. रविवार सकाळाचा दिवस होता. ते म्हणाले चल आपण बाहेर जाऊ. रान जवळच होत. त्यात मला नेल. एका आदिवासी माणसाच घर दाखवल. गरिबी काय असते हे मी पहिल्यांदाच पाहिल होत तेव्हा. मग त्याच आदिवास्याच्या मुलाबरोबर मला बोरं आणायला पाठवल. त्यावेळी पायात कोणाच्याच चपला नसायच्या. माझ्याही नव्हत्या. २-३ बोरं आणेपर्यंत पायात काटे रुतले. परत आलो. वडलांनी मला जवळ घेतल म्हणाले की

"शबरी किती गरिब असेल समजल का ?" मी होकारार्थी मान हलवली.

मग त्यांनी त्या वातावरणात शबरीची गोष्ट परत सांगितली म्हणाले

"त्या शबरीनी राम येणार म्हणून खुप बोर आणली. तीला किती बर काटे रुतले असतील ? जर रामानी बोरं उष्टी आहेत म्हणुन खाल्ली नसती तर त्या शबरीला किती बरं वाईट वाटल असत." मला एकदम ही गोष्ट पटली. रामाबद्दल आदर वाढला.

वडिल खुप मेहनत करत. मुंबईला नोकरीला जायचे. ठाणा स्टेशनवरुन आमच घर ५-६ मैल लांब होत. तेव्हढ अंतर चालत जाऊन ऑफ़िसमधे मेहनतीच काम करण साध नव्हत. शिवाय घरी आले की शेतीच काम, गुरांच काम होतच. खुप पसारा त्यांनी वाढवला होता. कमी शिकले असले तरी जे शिकले ते ब्रिटिशांच्या वेळच्या इंग्रजी शाळेत शिकले होते. इंग्रजीवर प्रभुत्व होत. ते एक चालती बोलती डिक्शनरी होते.

मुलांना जास्तीत जास्त शिकवायच व हे शिकवत असताना त्यांच्यासाठी काही तरी स्थावर मिळकत उभी करायचीच या ध्येयानी ते पछाडलेले होते. स्वतः १६ व्या वर्षी गिरणीत नोकरीला लागले, ते एक हेल्पर म्हणून आणि काम शिकत शिकत ते कॉस्ट अकाऊंटंट झाले. त्यांनी अनेक हालअपेष्टा काढल्या होत्या, पण त्याची साधी झळसुद्धा आमच्या पर्यंत येऊ दिली नाही. हे करताना नेहेमी ते आनंदी असायचे. मी तुमच्यासाठी किती करतोय, त्याची जाणिव ठेवा वगैरे कधीच लेक्चर दिल नाही. आईची त्यांना साथ होतीच पण मुख्य जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर होती.

बहिणी मोठ्या होत्या, आम्ही मुलं लहान होतो. मुलींची लग्न, बाळंतपणं, आला गेला या सर्वांच त्यांनी केल. आणि त्यातच आमची शिक्षणं केली. प्रॉप्रर्टीच्या केसेस पूर्ण केल्या. आमच्यावर कोणतीच जबाबदारी ठेवली नाही. मोठी घरं मात्र ठेवली.

मला नोकरी लागली. पहिला पगार १ तारखेला यायचा होता. त्यावेळच्या मानानी पगार बरा होता. ३० तारखेला त्यांनी नेहेमीसारख बजेट केल व मला म्हणाले

"आयुष्यात पहिल्यांदा बजेट केल आणि पैसे शिल्लक राहिलेत"

हे बोलताना त्यांच्या चेहर्‍यावर इतक समाधान होतं.

मी विचारल की "येताना तुमच्यासाठी काय आणू ?"

ते म्हणाले "मला मिठाई व नानकटाई खावीशी वाटते. मी कधीच मजा म्हणून या गोष्टी खाल्या नाहीत"

आमच्यासाठी त्यांनी स्वतःचे किती हाल करुन घेतले असतील हे प्रथमच मला जाणवल. १६ व्या वर्षापासून नोकरीकरुन स्वतःच्या आई, बहिण व भावाला सांभाळताना. व नंतर संसाराचा गाडा ओढताना त्यांनी कितीतरी कॉंप्रमाईज केलेली असतील. या उतार वयात या कर्तबगार माणसाला या साध्या गोष्टी खाव्याशा वाटत होत्या.

मी पगार मिळताच येताना सर्वात पहिल्या या दोन गोष्टी विकत घेतल्या आणि घरी आलो. आण्णा झोपलेले होते. त्यांना खुप ताप होता.

मला म्हणाले की "मी ताप उतरला की मी मिठाई व नानकटाई खाणार आहे."

दोन दिवस ताप होता व तिसर्‍या दिवशी त्यांना हार्टअ‍ॅटॅक आला. अ‍ॅंब्युलन्स बोलावली व त्यांना हॉस्पिटलमधे नेल. त्यांच्या चपला न्यायच्या राहुन गेल्या.

ते म्हणाले "निरंजन माझ्या चपला इथे आण रे"

मी घरी आलो आणि त्यांच्या चपला उचलल्या. पार झिजुन त्याच्या टाचांना भोकं पडली होती. आमच्यासाठी त्यांनी न बोलता किती खस्ता खाल्या होत्या, किती मेहनत केली होती, हे त्या चपलाच मला सांगत होत्या.
मी नोकरीच्या इंटर्व्हुला जाणार म्हणून माझ्यासाठी त्यांनी जबरदस्तिनी आणायला लावलेले नवे कोरे बुट माझ्या आधीच्या चांगल्या स्थितीतल्या बुटांच्या बाजुलाच होते आणि माझ्या पायात नवी चप्पल होती.
आजवर मला हे मिळाल नाही, ते मिळाल नाही, म्हणून खट्टू होणार्‍या मलाच मी मनातल्या मनात शिव्यांची लाखोली वाहिली.

आण्णांचा तोच एकमेव चपलांचा झिजलेला जोड माझ्या हातात होता. मी तसाच तो डोक्याला लावला मनोमन त्यांना नमस्कार केला. त्यांच्या त्या त्यागापुढे नतमस्तक झालो होतो. माझ्या नकळत माझे डोळे भरुन आले आणि अश्रु त्या पवित्र चपलांवर पडले.